Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषाच्या पोटातून डॉक्टरांनी काढले गर्भाशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:30 IST

जे.जे. हॉस्पिटलमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया । जगात आतापर्यंत अशा प्रकारच्या फक्त २०० रुग्णांची नोंद

मुंबई : वंध्यत्व निवारणासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पोटातून जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने गर्भाशय आणि त्याच्याशी निगडित इतर अवयव शस्त्रक्रिया करून बाहेर काढले. जगात आजपर्यंत अशा प्रकारच्या फक्त २०० रुग्णांची नोंद असल्याची माहिती जे.जे.चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जे.जे.च्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. व्यंकट गीते आणि त्यांच्या पथकाने ही अवघड व दुर्मीळ शस्त्रक्रिया केल्याचेही ते म्हणाले. जे.जे.च्या युरॉलॉजी विभागात मूल होत नाही म्हणून डॉ. गीते यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित जोडप्यापैकी पुरुषाची चाचणी घेतली असता त्या व्यक्तीचे अंडाशय हे पोटातच असल्याचे आढळले. त्याची अंडकोषापर्यंत वाढच झालेली नव्हती. त्या व्यक्तीच्या लिंगाची वाढ व्यवस्थित होती; पण वीर्य तपासणीत शुक्राणू आढळले नाहीत म्हणून डॉ. गीते यांनी त्या व्यक्तीची ‘अनडिसेंडेड टेस्टीज’ या निदानाखाली शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्या व्यक्तीच्या अंडाशयासोबत महिलांमध्ये आढळणारे गर्भाशयासारखे अवयव दिसले. नंतर त्या व्यक्तीस हॉर्मोनल, सिटी, एमआरआय व बायोप्सी चाचण्यांसाठी पाठविण्यात आले. त्या वेळी त्या व्यक्तीमध्ये सहा बाय अडीच बाय दोन आकाराचे गर्भाशय, त्याच्याशी निगडित अवयवांसोबत आढळले. याला ‘फिमेल प्रायमरी मुल्येरियन डक्ट सिंड्रोम’ असे निदान केले गेल्याचे डॉ. व्यंकट गीते यांनी सांगितले. रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून गर्भाशय काढून त्याचे अंडाशय अंडकोषात सरकविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कन्व्हर्जन शस्त्रक्रियेत गर्भाशय प्रत्यारोपण अवघडच्रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलेल्या या रुग्णावर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून त्याचे अंडाशय हे अंडकोषात सरकविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.च्अशा रुग्णांमध्ये कन्व्हर्जन शस्त्रक्रिया करता येते; पण गर्भाशय प्रत्यारोपण तसेच गर्भ राहणे अवघड असते, असे सांगून डॉ. गीते म्हणाले, आत्तापर्यंत जगात फक्त दोन रुग्णांमध्ये यशस्वीरीत्या पालकत्व सिद्ध झाले आहे.