Join us  

आरटीई प्रवेशांसाठी यूट्युबचा वापर; मराठी, हिंदीत मिळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:50 AM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील.

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. शिक्षण विभागाने यंदा आरटीईच्या माहितीचे व्हिडीओ यूट्युबवर अपलोड केले आहेत. या माध्यमातून पालकांना प्रक्रिया अधिक योग्य प्रकारे समजेल आणि प्रवेशावेळी चुका टाळल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आर्थिक आणि दुर्बल घटकातील पालकांचा विचार करून हे व्हिडीओ हिंदी आणि मराठी भाषेत तयार केले आहे.हिंदी, मराठी भाषेतील या व्हिडीओमध्ये आरटीई म्हणजे काय? त्यासाठीची प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सोबतच उत्पन्नाचे दाखले घेताना दलालांपासून कसे सावध राहावे? प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक याबद्दलही माहिती आहे.लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता ब्लॉक व्हेरिफिकेशन सेंटर, अ‍ॅडमिशन सेंटरवर जायचे आहे. तेथे ओरिजिनल कागदपत्रे घेऊन ती ब्लॉक एज्युकेशन आॅफिसरकडून साक्षांकित, प्रमाणित करून त्यानुसारच शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत. आॅनलाइन प्रक्रियेमध्ये हे पर्याय आधी शाळेच्या लॉगइनमध्ये होते. मात्र आता ते अधिकार या समितीकडे असतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे.अधिकाधिक जागा भरण्यास होईल मदतआरटीईसंदर्भात सविस्तर माहितीसाठी दिलेल्या सुविधेचा पालकांनी जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे पालकांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक स्पष्टता येण्यास मदत होईल. यामुळे आरटीईच्या अधिकाधिक जागा भरण्यास मदत होईल. - महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई पालिका

टॅग्स :शिक्षण हक्क कायदा