Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक जिंकण्यासाठी भिवंडीत जादूटोण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:07 IST

नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील ...

नितीन पंडित

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भिनार ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे. मात्र, या अशा जादूटोण्याला गाववाले घाबरणार नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा होत असेल, तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. भिवंडीतील भिनार गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक १ मधून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनलचे भीमराव कांबळे, करुण भोईर व लक्ष्मी भोईर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या प्रचारपत्रकात अर्धे लिंबू कापून, हळद-कुंकू व तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडाखाली फेकून दिला होता.

शनिवारी गावातील एक व्यक्ती बोरं खाण्यासाठी या झाडाजवळ गेली असता त्या व्यक्तीला हा प्रकार दिसल्याने त्याने गावातील नागरिकांना सांगितले. त्यानंतर तिन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी धाव घेतली. मांत्रिकांच्या साहाय्याने करणी व जादूटोण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहोत. प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जातील, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी दिली.

अशा प्रकारच्या जादूटोण्याने निवडणूक जिंकता येत नसून गावात विकासकामे करूनच निवडणूक जिंकता येते, हे विरोधकांना माहीत नसेल म्हणूनच त्यांनी असा घृणास्पद प्रकार केला आहे. याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी योग्य तपास करावा, असेही उमेदवारांनी म्हटले आहे.