- मनीषा म्हात्रे, मुंबईशाळेतील एकामागोमाग एक अशा दहा हार्डडिक्स गायब झाल्याने शिक्षक वर्ग चक्रावले होते. हे गूढ कायम असताना हार्डडिक्स विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या २६ वर्षीय चोराच्या सायन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शाळेतील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धमकावून या लुटारूने त्याच्यामार्फत चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.उमर मुस्तफा शेख (२६) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या आहेत.सायन परिसरातील एका महापालिका शाळेत १२ वर्षीय मोहित (नाव बदललेले आहे) आठवी इयत्तेत शिकतो. घरफोडी, चोरीमधील सराईत आरोपी शेख गेल्या काही दिवसांपासून चोरीची संधी शोधत होता. मात्र हाती काहीच लागत नसल्याने तो त्रस्त झाला होता. त्याचवेळी शाळेतून घरी जात असलेल्या मोहितला त्याने रस्त्यात अडविले. शाळेत चोरी करण्यासारखे काय आहे? असे त्याने त्याला विचारले. सुरुवातीला हसण्यावर घेत शाळेत चोरीसारखे काहीच नसल्याचे सांगून मोहित तेथून निघून गेला.मात्र शेखने दुसऱ्या दिवशी पुन्हा मोहितला शाळेबाहेर अडवून त्याला धमकावले असता, त्याने शाळेत संगणकाशिवाय काहीच नसल्याचे सांगितले. संगणक चोरी करणे शक्य नसल्याने त्याने मोहितला संगणकातील हार्डडिक्स चोरून आणण्यास सांगितले. चोरी केली नाहीस तर मी तुला ठार मारेन, अशी धमकी त्याने मोहितला दिली.अखेर शेखच्या धमकीने धास्तावलेल्या मोहितने त्याला होकार दिला व शाळेतील हार्डडिक्स चोरी करण्यास सुरुवात केली. लागोपाठ दहा हार्डडिक्स त्याने लंपास केल्या. याने शाळेचे शिक्षकही हैराण झाले होते. या प्रकरणी त्यांनी जुलै महिन्यात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच शेखने हार्डडिक्स घेऊन पळ काढला. पळण्याआधी शेखने मोहितला धमकावले. चोरीबाबत कोणाशी काहीही बोलू नकोस, माझी माणसे तुझ्या मागावर आहेत. जर तू याबाबत कुणाला काही सांगितले तर तुझी खैर नाही, असे शेखने मोहितला धमकावले होते. त्यामुळे भीतीने मोहितने कुणाला काहीच सांगितले नाही.याप्रकरणी गुन्हा दाखल करून सायन पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांचे तपास पथक पोलीस शिपाई धनंजय पाटील, हवालदार साळुंखे, पोलीस नाईक नारायण गाडेकर आणि गगनहड्डी यांनी आरोपीचा शोध सुरू केला. शेख हार्डडिक्स विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोहित अजूनही दडपणाखालीपोलिसांनी मोहितचे घर गाठून शेखचे म्हणणे खरे आहे का, याची विचारपूस केली. पोलिसांनी मोहितचे समुपदेशन करून त्याला विश्वासात घेतले आहे. मोहितने शेखच्या प्रतापाला वाचा फोडली. मात्र झालेल्या घटनेनंतर मोहित पूर्णत: घाबरला असून अजूनही तो त्याच दडपणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीसाठी शाळेच्या विद्यार्थ्याचा वापर
By admin | Updated: August 25, 2015 05:15 IST