Join us

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याचे तेल वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या जेवणात सर्रासपणे रिफाइंड तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या जेवणात सर्रासपणे रिफाइंड तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्य तो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तेल रिफाइंड करताना केमिकलचा वापर केला जातो. ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेजस् तयार होतात. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. वात विकार असंतुलित राहतात, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञ अभिषेक मिश्रा यांनी दिली. तेल रिफाइंड करताना सुरुवातीला ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाइंड करताना तेल अनेकवेळा उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात. ते शरीरासाठी अपायकारक ठरतात, असे डॉ. मिश्रा म्हणाले.

........

रिफाइंड तेल घातक का?

- अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही.

- सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन अशा प्रकारची केमिकल्स वापरली जातात.

- रिफाइंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही.

- रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात.

- रिफाइंड तेलामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात.

........

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

.............

शुद्ध तेल आजारांवर गुणकारी

शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेला हायडेन्सिटी लिपोप्रोटीन हा घटक लिव्हरमध्ये तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

..........

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वांधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.