कर्जत : कर्जत - कल्याण राज्य मार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीए कडून सुरु आहे. रस्त्यावरील दुभाजक बांधण्याचे काम प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून सुरु आहे. त्यात फुलझाडे लावण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी याठिकाणी लाल माती टाकण्याचे निर्देश असताना कर्जत तालुक्यातील हद्दीत ठेकेदार कंपनीने मुरुम टाकला असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कर्जत शिवशाही संघटनेने केली आहे.कर्जत तालुक्यातील रस्त्यासाठी जवळपास सत्तर कोटींची तरतूद मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. त्यात रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि रस्त्याच्या दुतर्फा गटारे अंतर्भूत करण्यात आली आहेत. ही गटारे आरसीसी काँक्रीटची बांधण्याचे आदेश निविदेत होते. तर दुभाजकांमध्ये झाडे लावून रस्त्याचा परिसर हिरवागार राहावा, फुलांची झाडे बहरावीत, या हेतूने एमएमआरडीएने याठिकाणी लाल माती टाकण्याच्या सूचना निविदेत देण्यात आल्या आहेत. मात्र ठेकेदार कंपनीने लाल माती खरेदी करण्याची तसदी घेतली नसल्याचे जागोजागी दिसून येत आहे.दुभाजकांमध्ये परिसरातील डोंगर खोऱ्यात असलेला मुरुम टाकण्यात येत आहे. त्यामुळे डोंगर फोडताना नष्ट झालेली झाडे, त्यांची मुळे यांचाही भरणा दुभाजकात होत आहे. यामुळे या मातीत फुलझाडे बहरतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मातीऐवजी मुरुमाचा वापर
By admin | Updated: January 22, 2015 23:59 IST