Join us  

सामान्यांप्रमाणे आम्हालाही सुविधांचा लाभ द्या; तृतीयपंथीयांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 4:17 PM

तृतीयपंथीयांनी कोणताही गुन्हा केल्यास त्यांच्यावर सामान्य लोकांप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. मात्र ज्या सुविधा व योजनांचा लाभ सामान्यांना दिला जातो. त्याचा लाभ मात्र आम्हाला दिला जात नाही, अशी खंत किन्नर माँ ट्रस्टच्या समन्वयक प्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांनी कोणताही गुन्हा केल्यास त्यांच्यावर सामान्य लोकांप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो.. मात्र ज्या सुविधा व योजनांचा लाभ सामान्यांना दिला जातो. त्याचा लाभ मात्र आम्हाला दिला जात नाही, किन्नर माँ ट्रस्टच्या समन्वयक प्रिया पाटील यांनी खंत व्यक्त करुन त्यांचा लाभ आम्हालाही द्या, अशी मागणी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात सरकारकडे केली. 

- राजू काळे  

भार्इंदर- तृतीयपंथीयांनी कोणताही गुन्हा केल्यास त्यांच्यावर सामान्य लोकांप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. मात्र ज्या सुविधा व योजनांचा लाभ सामान्यांना दिला जातो. त्याचा लाभ मात्र आम्हाला दिला जात नाही, अशी खंत किन्नर माँ ट्रस्टच्या समन्वयक प्रिया पाटील यांनी व्यक्त करुन त्यांचा लाभ आम्हालाही द्या, अशी मागणी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात सरकारकडे केली. 

तृतीयपंथीयांनी स्वच्छता अभियानापासून ते कौशल्य विकास, नशामुक्ती अशा जनयोजनांच्या प्रसारासाठी सरकारला भरीव सहकार्य केले आहे. या कार्याचा गौरव मात्र सरकारकडून कधीच केला जात नसल्याची खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. यामुळे या समाजातील लोकांच्या पदरी निराशाच पडते. समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथीयांना सामावून घेण्याचे सुतोवाच सरकारकडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र तृतीयपंथीयांच्या धोरणाबाबत सरकारच संभ्रमात असल्याने हा समाज सरकारी योजनांपासून अद्याप वंचित राहिला आहे, असंही त्या म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने सामान्यांप्रमाणेच तृतीयपंथीयांना हक्क द्या, असे आदेश दिले असतानाही सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या समाजातील लोकांनाही आरक्षण मिळण्याचा मुलभूत अधिकार असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गात सामावुन घेण्यासाठी तीन वर्षांपुर्वी काढलेल्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची कैफियत त्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर मांडली. यावेळी त्यांनी ट्रस्टने सरकारी योजनांतर्गत केलेल्या सामाजिक कामांचा पाढा वाचला. 

पालघर जिल्ह्यात ट्रस्टच्यावतीने साडेसात हजार शौचालये बांधण्यात आली. तत्पुर्वी ट्रस्टच्या सदस्यांनी जिल्ह्यातील ११ गावांना संपर्क साधून त्यातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. त्यानंतर बांधण्यात आलेल्या शौचालयांचा वापर अधिकाधिक लोकांकडून केला जात असल्याची सचित्र माहिती सरकारी संकेतस्थळावर पाठविली जात आहे. असे असतानाही सरकारला जनहितांच्या योजनांत सहकार्य करणाऱ्या तृतीयपंथीयांनाच वंचित ठेवले जात असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समाजानेही या लोकांना स्विकारुन त्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. शिबिरात विधी प्राधिकरणाचे अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी खेअर, तहसिलदार पाटील, भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, नवघरचे पोलिस निरीक्षक गंगजे, ठाणे ग्रामीण समाजसेवा शाखेचे प्रभारी संजय बांगर व तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी महाराज उपस्थित होते.