Join us  

उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:51 PM

Urmila Matondkar News : उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर ह्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देउर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती

मुंबई - प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार आता उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर ह्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे तसेच उर्मिला मातोंडकर यांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत होते.राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पदांसाठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वणकर यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना संधी दिली आहे.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरशिवसेनाराजकारण