Join us

कडवई रेल्वे स्थानकासाठी आग्रह

By admin | Updated: January 7, 2015 23:58 IST

जितेंद्र चव्हाण : मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कडवई रेल्वे स्थानकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली आहे.कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी मनसेने ग्रामस्थांच्यावतीने अनेक आंदोलने छेडली. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने कडवई येथे रेल्वेचा थांबा मंजूर केला. मात्र, निधीअभावी हे काम सुरु होऊ शकले नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २६ जानेवारी २०१५ रोजी रेल रोकोचा इशारा दिला आहे.नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असताना मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी याबाबत निवेदन सादर केले आहे. सदरचे काम निधीअभावी पूर्ण झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. याकरिता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली आहे.या ठिकाणी रेल्वे स्थानक उभारले गेले तर कडवई पंचक्रोशीसह इतर १८ गावांना याचा फायदा होणार आहे. त्याद्वारे या भागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कडवई येथे स्थानक व्हावे ही कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली मात्र त्याला यश आले नाही. नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रभू यांच्याकडे मनसेने हे निवेदन दिल्यामुळे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)