Join us  

'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण

By संजय घावरे | Published: December 18, 2023 8:56 PM

'मिरास'मध्ये सचिन पिळगावकरांनी सांगितली आठवण

मुंबई- बाल वयातच सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर आज नव्या पिढीसाठी मार्गदर्शकाप्रमाणे काम करत आहेत. मीनाकुमारी यांच्या सान्निध्यात राहून उर्दूचे धडे गिरवणाऱ्या पिळगावकरांचे या भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. मिरास - फेस्टीव्हल ऑफ हिंदुस्थानी कल्चर अँड लिटरेचर या कार्यक्रमात बोलताना सचिन यांनी मराठी बरोबरच उर्दू भाषेवर आपले अपार प्रेम असल्याचे सांगितले. 

नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भारतीय भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि प्रसार करणाऱ्या 'पसाबण -  ए -अदब' यांच्या वतीने 'मिरास - फेस्टीव्हल  ऑफ हिंदुस्थानी कल्चर अँड लिटरेचर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय साहित्य, कविता, संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत १६ आणि १७ डिसेंबर रोजी रंगलेल्या महोत्सवात सचिन यांना उर्दू भाषेवर प्रेम कसे जडले असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उर्दू भाषा माझ्या आयुष्याचाच नाही तर माझ्या शरीराचाच एक भाग असल्याचे सांगत ते म्हणाले की, मराठी चित्रपटानंतर हिंदी चित्रपटात बाल कलाकार म्हणून माझा प्रवास सुरु झाल्यावर दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा 'मजली दीदी' चित्रपट करत होतो.

ग्रेट ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारी 'मजली दीदी' साकारत होत्या. त्यांना 'मजली दीदी' म्हणणारा मी नऊ वर्षांच्या अनाथ मुलाची भूमिका करत होतो. चित्रीकरण सुरु असताना मिनाजींनी  मला बोलावले आणि तू घरी कोणती भाषा बोलतोस असे विचारले. मी म्हटले मराठी. मातृभाषा कोणती? मी म्हटले मराठी. मग त्या म्हणाल्या की, हिंदी कधी बोलतोस? मी सांगितले सेटवर आल्यावर. सेटवर मराठी लोकांशी मराठीतच बोलतो. या उत्तरानंतर त्या गप्प होत्या. ते ऐकून त्या म्हणाल्या की, तू तुझ्या आई-वडिलांना सेटवर घेऊन ये. असे म्हटल्यावर मी घाबरलो. शाळेत आई-वडिलांना बोलावल्यावर जशी स्थिती होते तशी माझी झाली होती.

आई-वडील सेटवर आल्यावर मीनाजी म्हणाल्या की, तुमचा मुलगा उत्तम अभिनेता आहे, पण त्याच्या हिंदीमध्ये मराठीचा लहेजा असल्याचे जाणवते. त्याला उर्दू बोलता येणे खूप  गरजेचे आहे. यासाठी काय करायला पाहिजे? कुठे घेऊन जायला पाहिजे? असे आई-वडिलांनी विचारले. यावर त्या म्हणाल्या की, मी गाडी पाठवेन. आठवड्यातून चार दिवस शाळा सुटल्यावर दोन तास त्याला माझ्याकडे पाठवा. मी याला उर्दू बोलायला शिकवेन. मी गाडीतून जुहूला जायचो. गेल्यावर आधी एक तास टेबल टेनिस खेळायचो आणि मग त्या एक तास उर्दू शिकवायच्या. मला उर्दू लिहिता-वाचता उर्दू आले नाही, तरी चालेल पण बोलल्यानंतर कोणीही मागे वळून बघितले पाहिजे असा त्यांचा विचार होता असे सांगत सचिन भूतकाळातील आठवणीत रमले.

दोन दिवस चाललेल्या 'मिराज'च्या विविध सत्रांमध्ये कथ्थक ऑन गझल - नीरजा आपटे आणि टिम, सूफी संगीत वादक पद्मश्री उस्ताद अहमद हुसेन, पद्मश्री उस्ताद मोहम्मद हुसेन, मिकी सिंग नरुला, इर्शाद कामिल, जावेद अख्तर, ज्योती त्रिपाठी, खान शमीम, मुझफ्फर अब्दाली, नोमान शौक, ओबेद आझमी, क्वेसर खालिद, रणजीत चौहान, सचिन पिळगावकर, ग्रॅमी पुरस्कार नामांकित उस्ताद शुजात हुसेन खान यांच्यासह विविध कलाकार सितार विथ सारेगममध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :सचिन पिळगांवकरमुंबई