Join us

गानसरस्वती लता दीदींच्या जीवनावर आधारित भित्तिशिल्पाचे अनावरण; मंगलप्रभात लोढा यांनी केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2024 16:15 IST

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंगेशकर कुटुंबीय आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या भित्तीशिल्पाचे उदघाटन करण्यात आले

मुंबई: गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील अफाट योगदानाला मानवंदना देण्याच्या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भित्तीशिल्प साकारण्याची संकल्पना मांडली होती. त्या अनुषंगाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर महापालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून लता मंगेशकरांच्या जीवनावर आधारित भित्ती शिल्प साकारण्यात आले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंगेशकर कुटुंबीय आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या भित्तीशिल्पाचे उदघाटन करण्यात आले. हे भित्तिशिल्प ५० फूट लांब आणि १५ फूट उंच आकाराचे असून, यामध्ये लता मंगेशकरांचा जीवनपट अतिशय कलात्मकरित्या उलगडला आहे. त्यांच्या संगीताच्या प्रवासातील विविध टप्पे येथे दर्शविले गेले आहेत. ज्या गाण्यांना त्यांनी अजरामर बनवलं, ज्या वाद्यांची त्यांना साथ मिळाली, त्यांच्या गाण्यांना जी दाद मिळाली हे सर्वच या भित्तिशिल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. 

"लता दीदींचा सूर या जगात अनंत काळ टिकून राहिल इतकं त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान मोठं आहे. त्यांच्या कार्याला एक नम्र मानवंदना देण्याच्या उद्देशाने आम्ही हे भित्तीशिल्प उभारले आहे. लता दीदींचा मला सहवास लाभला, त्यांचे गाणे ऐकण्याची संधी मिळाली या गोष्टीचे अतिशय समाधान आहे. पुढील पिढीला देखील त्यांच्या संगीत प्रवासाची माहिती या शिल्पाच्या माध्यमातून मिळेल." असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :लता मंगेशकरमंगलप्रभात लोढा