Join us  

आदेश न निघताच महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:24 AM

दुसऱ्या तिसऱ्या फळीतील काही नेत्यांची नियुक्ती राज्याच्या विविध महामंडळांवर झाल्याचे मंगळवारी रात्री शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले

- यदु जोशीमुंबई : दुसऱ्या तिसऱ्या फळीतील काही नेत्यांची नियुक्ती राज्याच्या विविध महामंडळांवर झाल्याचे मंगळवारी रात्री शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले, पण सरकारने अशी कोणाची नियुक्तीच केलेली नसल्याची बाब ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीतून समोर आली.मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मातोश्रीमध्ये वजन असलेल्या एका पदाधिकाºयाने काही पत्रकारांना शिवसेनेतून कोणाकोणाला महामंडळांवर नियुक्त केले आहे, याची दोन पानी यादी पाठविली. सरकारी आदेश वाटावा, अशा कागदावर ही यादी होती. महामंडळांवर भाजपा-सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी अनुक्रमे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर सोपविण्यात आली होती आणि त्यांनी आपापल्या पक्षाच्या याद्या तयार केल्या होत्या. मात्र, नियुक्त्यांचा आदेश निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निघू शकला नाही. आचारसंहितेच्या काळात अशा नियुक्त्याच करता येत नाहीत. तरीही काल रात्री शिवसेनेकडून त्यांच्या नियुक्त्यांच्या कथित आदेशाला पाय फुटले आणि यादी प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यात आली. काहींनी लगेच त्याच्या बातम्याही केल्या. पण शहानिशा केली असता शासकीय पातळीवर असा कोणताही आदेश निघाला नसल्याचे मंत्रालयातून अधिकृतपणे लोकमतला सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की या नियुक्त्यांची एक प्रक्रिया असते. ज्या महामंडळावर नियुक्ती करायची आहे तिथे ते पद रिक्त आहे का याची माहिती आधी मागवावी लागते. महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष वा सदस्य यांच्या नियुक्तीचे काही नियम व निकष आहेत. तसेच आवश्यक तेथे पोलीस पडताळणीदेखील केली जाते. शिवाय, प्रत्येक नियुक्ती ही राजपत्रात (गॅझेट) आल्याशिवाय अधिकृत मानली जात नाही. कालपासून फिरत असलेल्या नियुक्त्यांपैकी एकही अद्याप राजपत्रात आलेली नाही.अधिकृत निर्णय न होता यादी पसरविण्याचे काम शिवसेनेच्या नेते, कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय करण्यासाठी केले असावे. महामंडळांवर साडेचार वर्षांत नियुक्त्याच करण्यात आल्या नाहीत यावरुन पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी यादी सोडून देण्यात आली असावी, असे म्हटले जात आहे. शिवसेनेपाठोपाठ आज पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील काही भाजपा नेत्यांची महामंडळांवर नियुक्ती करण्यात आल्याची बातमी पसरली. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी तर शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे यांची म्हाडा; पुणेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. पक्षाकडून अशी कोणतीही यादी प्रसिद्धीला देण्यात आलेली नसल्याचे भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.शिवसेना वा भाजपाच्या ज्या नेत्यांची नावे सोशलमीडियामध्ये काल रात्रीपासून झळकणे सुरू झाले त्यांनी वा त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाच्या जाहिरातींचे फलक लावणेही सुरू करून टाकले.

टॅग्स :शिवसेना