ठाणे : मुंबईतील मालवणी भागात भेसळयुक्त दारूमुळे सुमारे १०० हून अधिक जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्याने आता स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सर्तक झाली आहे. या घटनेची दखल घेऊन तिची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बेकायदा हातभट्ट्यांचा शोध घेऊन त्या उद्धवस्त करून त्या चालविणाऱ्यांना अटक करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्तांसह ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागिय अधीक्षकांना दिले आहेत.मालवणी येथे बनावट देशी दारू पिऊन १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून दररोज बळींची संख्या वाढत आहे. या प्रकरणी तपासात ठाणे जिल्ह्यात, विशेषत: दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा हातभट्ट्यांच्या माध्यमातून गावठी दारू बनवण्यात येत असल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंतर त्याची गंभीर दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यांनी तत्काळ ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राजेश प्रधान आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार वरील निर्देश दिले. प्रत्येक जीव मोलाचा असून गोरगरिबांच्या बळींचे पातक ठाणे जिल्हा आपल्या माथ्यावर घेणार नाही. जिल्ह्यासाठी ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे या बनावट हातभट्ट्या त्त्वरीत उद्धवस्त करुन गोरगरिबांचे प्राण वाचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
बेकायदा हातभट्ट्या उद्धवस्त करा- एकनाथ शिंदे
By admin | Updated: June 25, 2015 00:47 IST