Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा नवीन वर्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:18 IST

मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा झाले. तरीही विद्यापीठाने अभ्यासक्रम पूर्ण न करता

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा झाले. तरीही विद्यापीठाने अभ्यासक्रम पूर्ण न करता, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढला होता. अखेर विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांची मागणी ऐकून परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला, यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात जाहीर केल्या होत्या, पण याला विद्यार्थ्यांना विरोध केला. त्यानंतर, एमए आणि एमकॉमच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमएच्या अभ्यासक्रमांची परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होणार असून, एमकॉमचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.नवीन वेळापत्रकाची आखणी करताना, विद्यापीठाने संबंधित विषयांच्या अधिष्ठात्यांची एक विशेष बैठक घेतली होती. या बैठकीनंतर नवीन वेळापत्रकाची आखणी करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, एमएची परीक्षा आता २३ जानेवारीपासून होणार असून, एमकॉमचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असेही प्रशासनाने या वेळी नमूद केले.निकालाला लेटमार्क लागल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश व्हायला आॅक्टोबर महिना उजाडला होता, तरीही परीक्षा विभागाने परीक्षा जाहीर केल्या. यामुळे ९० दिवसांच्या शिकविणीच्या नियमाची पूर्तता झालेली नाही, तर अनेक अभ्यासक्रम अद्याप पूर्ण शिकवून झालेले नव्हते. या प्रकरणी एमएस्सीच्या काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविल्यानंतर, परीक्षा विभागाने फक्त एमएस्सी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला. मात्र, एमकॉम आणि एमएच्या वेळापत्रकाबाबत परीक्षा विभागाला विसर पडल्याचे दिसून आले आहे.या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेत, या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. याची गंभीर दखल घेताना विद्यापीठाने अखेर वेळापत्रक बदलांची घोषणा केली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याची माहिती मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ