Join us

विद्यापीठाच्या शुल्कवाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत

By admin | Updated: June 13, 2014 01:46 IST

महाविद्यालयांच्या शुल्कवाढीबाबत विद्यार्थी संघटनांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने गुरुवारी फोर्ट कॅम्पसमध्ये बैठक आयोजित केली होती

मुंबई : महाविद्यालयांच्या शुल्कवाढीबाबत विद्यार्थी संघटनांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने गुरुवारी फोर्ट कॅम्पसमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुल्कवाढीला तीव्र विरोध केला. शिक्षण शुल्क समितीकडून विद्यार्थी संघटना, प्राचार्य संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधींची मते जाणून घेतली. सदस्यांनी दिलेल्या सूचनांचा अहवाल तयार करणार असून, तो मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात येणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून २५ टक्के सरसकट शुल्कवाढ देण्याबाबत विद्यापीठ स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. याबाबत विद्यार्थी संघटना, प्राचार्य संघटना आणि शिक्षक प्रतिनिधींची बैठक गुरुवारी फोर्ट कॅम्पसमध्ये झाली. या बैठकीत विद्यार्थी संघटनांनी शुल्कवाढीला तीव्र विरोध दर्शविला. प्राचार्य संघटनेनेही आपले मत व्यक्त केले. या बैठकीचा अहवाल शिक्षण शुल्क समितीकडून तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात येईल. त्यावर चर्चा झाल्यानंतरच शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)