Join us  

धक्कादायक ! मुंबई विद्यापीठाच्या ‘चॅम्पियन’ बॉक्सिंग संघाचा रेल्वेमध्ये शौचालयाच्या शेजारी बसून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:05 AM

शैक्षणिक परीक्षांच्या निकालाबाबत झालेल्या दिरंगाईबद्दल आधीच नाचक्की झालेल्या मुंबई विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभाग समोर आला आहे.

रोहित नाईक/मुंबई : शैक्षणिक परीक्षांच्या निकालाबाबत झालेल्या दिरंगाईबद्दल आधीच नाचक्की झालेल्या मुंबई विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभाग समोर आला आहे. क्रीडा विभागाकडून झालेल्या दुर्लक्षतेमुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या चॅम्पियन बॉक्सर्सना तिकीट कन्फर्फ न झाल्याने चक्क शौचालयाच्या बाजूला बसून प्रवास करावा लागत आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

पंजाब येथे १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचा ९ खेळाडू व प्रशिक्षक असा १० सदस्यांचा संघ ‘पश्चिम एक्सप्रेस’ने प्रवास करत आहे. मात्र, विद्यापीठकडून मिळालेल्या तिकिटांचे आसन कन्फर्म नसल्याने संपूर्ण संघाला प्रशिक्षकांसह चक्क शौचालयाशेजारी बसून पंजाबपर्यंतचा प्रवास कराव लागत आहे. 

सध्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंजाब येथे प्रवास करत असलेला मुंबई विद्यापीठाचा बॉक्सर सौरभ लेणेकर याने ‘लोकमत’ला माहिती दिली की, ‘आम्हाला आधीच कल्पना देण्यात आली होती की कोणाचेही तिकिट कन्फर्म नाही. परंतु, राष्ट्रीय स्पर्धेला जायचे असल्याने आमच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे आम्हाला शौचालयाशेजारी बसून प्रवास कराव लागत आहे. परंतु, दरवेळी उशीराने तिकिट काढले जात असल्याने बहुतेकवेळा अशीच वेळ खेळाडूंवर येते. सध्या तरी आम्ही कोणतीही तक्रार केली नसून आमचे सर्व लक्ष स्पर्धेवर लागले आहे.’

मुंबई विद्यापीठाला २०१५ साली सुवर्ण पदक मिळवून देणारा माजी बॉक्सर सम्राट इंगळे याने ‘लोकमत’कडे माहिती देतान सांगितले की, ‘मुंबई विद्यापीठाच्या विजेत्या खेळाडूंवर आलेली वेळ अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर विद्यापीठ खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा करते आणि दुसरीकडे खेळाडूंना प्रवासाच्या साध्या सुविधाही मिळत नाही. बाथरुमच्या बाजूला बसून सर्व खेळाडू एकमेकांच्यावर अंग टाकून प्रवास करत आहेत. अशावेळी कोणाला काही दुखापत झाली, तर रिंगमध्ये त्याचा फटका मुंबई संघाला बसेल. शेवटी ही राष्ट्रीय स्पर्धा आहे. मोठ्या परिश्रमाने खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी एकवर्ष झुंजत असतो. याकडे विद्यापीठाने गांभीर्याने लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे.’

दरम्यान, या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा प्रमुख उत्तम केंद्रे यांच्याशीही ‘लोकमत’ने संपर्क साधला. यप्रकरणी केंद्रे म्हणाले की, ‘मी दुसºया स्पर्धेत व्यस्त असल्याने याप्रकरणी मला काहीही कल्पना नाही. याबाबत काळे यांना अधिक माहिती आहे. त्यांच्याशी संपर्क करा.’ मुंबई विद्यापीठचे अधिकारी अनिल काळे यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते रजेवर असल्याचे उत्तर मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयातून मिळाले. त्यामुळे काळे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही. 

दखल घेण्याची बाब म्हणजे, मुलांच्या संघासोबत झालेल्या या घटनेनंतर आता लक्ष मुलींच्या संघावर लागले आहे. कारण, काही दिवसांतच पंजाब येथेच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचा मुलींचा संघही रवाना होणार आहे. मुलांच्या स्पर्धेनंतर २८ नोव्हेंबरपर्यंत मुलींची स्पर्धा रंगेल.

खेळ आणि खेळाडूंसाठी दुर्दैवाची बाब

बॉक्सिंग हा खेळ मस्ती-मस्करीचा विषय नाही. जगातील सर्वात कठीण खेळ असलेल्या बॉक्सिंगमध्ये भारत आज आॅलिम्पिकसारख्या खेळामध्ये पदकाची आशा ठेवून असतो. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मुंबई विद्यापीठासाठी चांगली कामगिरी करत असतानाही खेळाडूंना सुविधा मिळत नसतील, तर ते खेळ आणि खेळाडूंसाठी दुर्दैवाची बाब आहे.  सम्राट इंगळे, माजी बॉक्सर, मुंबई विद्यापीठ.

टॅग्स :मुंबई विद्यापीठक्रीडा