Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या २३ परीक्षा लांबणीवर

By admin | Updated: March 29, 2015 00:51 IST

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखांच्या २३ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखांच्या २३ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षा घेण्यात येत असल्याने सिनेट सदस्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. सदस्यांच्या विनंतीवरून परीक्षा विभागाने परीक्षा लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल आणि अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वी परीक्षा घेण्यात येत असल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्यांकडे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली होती. याबाबत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याकडे सिनेट सभागृहाचे लक्ष वेधत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. सिनेट सदस्यांच्या मागणीचा विचार करून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने टीवायबीए सेमिस्टर पाच-सहा, एमएचे विविध अभ्यासक्रम, टीवायबीकॉम, एमएससीचे काही अभ्यासक्रम आणि विधी शाखेचे एलएलएम सेमिस्टर वन आणि एलएलएम सेमिस्टर चार या अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे.विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या टी.वाय.बी.कॉम (सेमिस्टर सहा)ची परीक्षा ८ एप्रिलऐवजी २१ एप्रिलपासून सुरू होणार असल्याने बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्यानुसार सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.