Join us  

विद्यापीठाच्या परीक्षेलाही ‘लेटमार्क, एफवायबीए, एफवायबीकॉमची परीक्षा १ तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:54 AM

मुंबई विद्यापीठाने आॅनलाइनची कास धरली आहे. आॅनलाइन मूल्यांकनाबरोबरच परीक्षा केंद्रावर आॅनलाइन पेपर पाठविले जातात. आधीचा निकालाचा गोंधळ संपत नसतानाच आता विद्यापीठाच्या परीक्षेलादेखील ‘लेटमार्क’चा शिक्का लागला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅनलाइनची कास धरली आहे. आॅनलाइन मूल्यांकनाबरोबरच परीक्षा केंद्रावर आॅनलाइन पेपर पाठविले जातात. आधीचा निकालाचा गोंधळ संपत नसतानाच आता विद्यापीठाच्या परीक्षेलादेखील ‘लेटमार्क’चा शिक्का लागला आहे.विद्यापीठात मंगळवारी एफवायबीए आणि एफवायबीकॉमची परीक्षा होती. पण सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्रावर तब्बल एक तास उशिरा परीक्षा सुरू झाल्याची माहिती प्राचार्यांकडून मिळाली. विद्यापीठातर्फे परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पेपर पाठविण्यात येतात. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यापीठाकडून पेपर केंद्रांवर पोहोचले नाहीत. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी कला शाखेच्या पहिल्या वर्षाचा एफसीचा पेपर होता. तसेच, वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा सीए या विषयाचा पेपर होता. दोन्ही पेपर मंगळवारी दुपारी ३ वाजता होते. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने कोकणच्या परीक्षा केंद्रांत परीक्षा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू झाली नव्हती.परीक्षा तब्बल एक तास उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थी प्रचंड तणावाखाली होते. त्यांना पेपर सोडविण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होते. काही परीक्षा केंद्रांवर ३ऐवजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान परीक्षा सुरू झाल्याचे समजते. मुंबई विद्यापीठ आॅनलाइनमध्ये फेल होत असल्याचे हे चिन्ह असल्याचा आरोप मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी केला आहे.>धडा घेतलाच नाहीविद्यापीठात आॅनलाइन मूल्यांकनामुळे निकालाचा मोठा गोंधळ उडला होता. पण, त्यातूनही धडा न घेता विद्यापीठ हिवाळी परीक्षांचे पेपर आॅनलाइन तपासण्याचा अट्टाहास करत आहे. मंगळवारी सर्व्हर डाऊनचा धक्का सर्वच परीक्षा केंद्रांना बसला. निकालापाठोपाठ आता परीक्षेलाही लेटमार्क लागायला सुरुवात झाल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :विद्यार्थीपरीक्षा