Join us

विद्यापीठ, महाविद्यालयांच्या उन्हाळी परीक्षा बहुपर्यायी ऑनलाइन पद्धतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांत ज्या पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षांसाठी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांत ज्या पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षांसाठी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करतील अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. हिवाळी सत्र परीक्षांप्रमाणे बहुपर्यायी ऑनलाइन थिअरी पद्धतीने या परीक्षा पार पडणार असून, या परीक्षेत वर्णनात्मक थिअरी पद्धतीचाही समावेश असणार आहे. विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांची याआधीच केली गेलेली क्लस्टर विभागणी यावेळी कायम राहणार असून, एक लीड महाविद्यालय यावेळीही मार्गदर्शक म्हणून नियोजनाचे काम पाहणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून बुधवारी रात्री या मार्गदर्शक सूचना संलग्नित महाविद्यालयांना जारी करण्यात आलेल्या आहेत.

महाविद्यालयांना परीक्षांसाठी आवश्यक अहवाल एमकेसीएलच्या पोर्टलवर उपलब्ध होणार असून, अंतर्गत परीक्षांच्या नोंदी महाविद्यालयांनी २० एप्रिलच्या आधी करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाकडून नमूद करण्यात आले आहे. तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा या महाविद्यालयांच्या शिक्षकांनी गुगल मीट, स्काइप, झूम ॲपद्वारे महाविद्यालयातील शिक्षक या परीक्षा घेतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही त्यांना पर्ययी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांची असणार असून, त्यासाठी आवश्यक असल्यास त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी, असेही सुचविण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांची संधी हुकली आहे त्यांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून द्यावी, असे विद्यापीठाने सुचविले आहे.

.......

ऑनलाइन थिअरी परीक्षा वेळापत्रक तयार करताना महाविद्यालयांनी लीड महाविद्यालयाशी चर्चा करून सर्व परीक्षणाचे नियोजन एकाच वेळी होईल, असा प्रयत्न करावा अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

कला वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक शाखांच्या पदवी परीक्षा

१५ एप्रिल २०२१ ते ५ मे २०२१ - सत्र १ ते ४ (नियमित व बॅकलॉग)

६ मे २०२१ ते २१ मे २०२१ - सत्र ६ (नियमित व बॅकलॉग)

२४ मे २०२१ ते २ जून २०२१ - सत्र ५ (बॅकलॉग)

व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर परीक्षा

३ मे २०२१ ते २० मे २०२१ - सत्र ३ (बॅकलॉग) व सत्र ४ (नियमित व बॅकलॉग)

......

कसा असणार थिअरी परीक्षांचा पॅटर्न-

-पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेसाठी ५० गुणांची ऑनलाइन थिअरी परीक्षा घेण्यात यावी आणि यात ५० बहुपर्यायी प्रश्न देण्यात येऊन एक तासाची वेळ देण्यात यावी

-व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा (अभियांत्रिकी, फार्मसी, एमसीए) ८० गुणांची ऑनलाइन घेण्यात यावी आणि यात थिअरी परीक्षेत ४० गुणांचे ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा व ४० गुणांची वर्णनात्मक थिअरी परीक्षा घेण्यात यावी. यासाठी विद्यार्थ्यांना २ तासांची वेळ देण्यात यावी.

-आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी ४० गुणांची ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा व ८० गुणांसाठी डिझाइन प्रश्नांची थिअरी परीक्षा घेण्यात येऊन यासाठी विद्यार्थ्यांना २ तासाची यावेळी द्यावा

-विधि व आंतरविद्याशाखीय परीक्षेसाठी ३० गुणांची ऑनलाइन बहुपर्यायी व ३० गुणांची ऑनलाइन वर्णनात्मक थिअरी, अशी एकूण ६० गुणांची परीक्षा घेण्यात यावी. ३० गुणांच्या ऑनलाइन थिअरी परीक्षेसाठी १० बहुपर्यायी प्रश्न विचारून दीड तासाची वेळ देण्यात यावी.

.......

चौकट

निकाल होईल तसे विद्यापीठाला सादर करणे आवश्यक

ऑनलाइन निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकनाला सुरुवात शिक्षकांनी करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. ५ एप्रिलपासून डिसेंबरपासून प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षाना सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असल्याने पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसणार आहे.