Join us

या एकजुटीने मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

या एकजुटीने मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाहीआझाद मैदानातील सभेत विरोधी नेत्यांचा एल्गारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र ...

या एकजुटीने मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही

आझाद मैदानातील सभेत विरोधी नेत्यांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारच्या विरोधात आझाद मैदानातील सभेत भाजपविरोधातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांची एकजूट झाली आहे. महाराष्ट्रातील ही एकजूट देशभरात झाल्यास देशातून मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही. कृषी कायदे आणि कामगार कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशारा सोमवारी आझाद मैदानातील संयुक्त शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावरून सर्वच वक्त्यांनी दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह किसान सभेचे सचिव हनन किल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, बी.जी. कोळसे-पाटील, कुमार केतकर, मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी कृषी कायद्यांना विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा मोदी सरकारने सर्व प्रयत्न केल्याचा आरोप हनन मुल्ला यांनी केला. पण, शेतकरी संघर्ष यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नसल्याचे ते म्हणाले. तर, केंद्रातील मोदी सरकारचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी, असा कारभार सुरू असल्याचे अशोक ढवळे म्हणाले.

मोदी-शहांनी देशातील सर्व विकायला काढले, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. ही एकजूट कायम ठेवून लढा कायम ठेवणार असल्याचे ढवळे म्हणाले.

यावेळी शेकापचे जयंत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वनाधिकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तर, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, गाईची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, शेतकऱ्यांना संपवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला. याशिवाय, तिस्ता सेटलवाड, नरसय्या आडम, पी. साईनाथ, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचीही भाषणे झाली.

* उद्रेक वाढेल

मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. जनतेतही उद्रेक आहे. येणाऱ्या काळात हा उद्रेक अधिक वाढेल. कृषी कायद्यात आधारभूत किंमत नाही. बाजार समित्या नष्ट होणार आहेत. रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत ते रद्द झालेच पाहिजेत. भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली, किसान महाव्हर्च्युअल रॅली, आंदोलने, मोर्चा, राजभवनला घेराव घातला. देशभरातून दोन कोटी शेतकरी, शेतमजुरांच्या सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच कायदा केला जाईल.

- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

* भाजपला सत्तेचा माज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेचा माज आला आहे. लोकशाहीमध्ये सत्तेचा माज येण्याचा अधिकार आहे, पण तो माज जास्त काळ टिकत नसतो. हे शेतकरी, कामगार आणि कष्टकरी हा माज उतरविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. गेली अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर देशातील लाखो शेतकरी ऊन, पाऊस, गारांचा त्रास सहन करत आंदोलन करत आहेत, तसेच आज हजारो शेतकरी आझाद मैदानात एकत्र झालेले आहेत, हे या भाजप सरकारला दिसत नाही आहे. हे मोदी सरकार काही पुंजीपतींसाठी शेतकरी विरोधातील काळे कायदे मागे घेत नाही आहेत. दिल्लीतील भाजप नेते आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना मी इशारा देत आहे की सत्तेचा माज सोडा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकरी, कामगार व कष्टकरी तुमचा हा माज धुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाहीत.

- भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

-----