Join us

चेंबूरमध्ये रंगला अनोखा विवाह सोहळा

By admin | Updated: February 15, 2016 03:12 IST

लग्नाची आठवण कायम राहावी, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने लग्नाची तयारी करीत असतात. अशाच प्रकारे चेंबूरमध्ये एका दाम्पत्याने व्हॅलेंटाइनचा मुहूर्त लग्नासाठी साधला.

मुंबई : लग्नाची आठवण कायम राहावी, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने लग्नाची तयारी करीत असतात. अशाच प्रकारे चेंबूरमध्ये एका दाम्पत्याने व्हॅलेंटाइनचा मुहूर्त लग्नासाठी साधला. एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर या दाम्पत्याच्या लग्नाची वरात चक्क बुलेट मोटारसायकलवरून काढण्यात आली. या वरातीत सगळे वऱ्हाडीही ‘बुलेटधारी’ होते. तुषार मुतलीयार आणि दिव्या आचार्य असे या नवदाम्पत्याचे नाव आहे. तुषार चेंबूरचा तर दिव्या कल्याण येथील राहणारी आहे. सहा वर्षांपूर्वी एक कंपनीत कामाला असताना या दोघांची ओळख झाली होती. काही दिवसांत या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. दोन वर्षांपूर्वी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ही माहिती दिली. कुटुंबीयांनीही लग्नाला तत्काळ मंजुरी दिली. तथापि, करिअरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर लग्न करायचे, असे दोघांनी ठरविले. त्यानुसार तुषारने काही दिवसांपूर्वीच छोटासा व्यवसाय सुरू केला. यामध्ये दिव्यादेखील त्याला चांगली मदत करू लागली.व्यवसायाची गाडी रुळावर आल्यानंतर त्यांनी यंदाच्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नात काहीतरी वेगळे करावे, अशी तुषारची इच्छा होती. त्यामुळे त्याने त्याच्या काही मित्रांशी चर्चा केली. मित्रांशी झालेल्या चर्चेतून लग्नाची वरात बुलेटवरून काढण्याची कल्पना समोर आली. त्यानुसार आज चेंबूरच्या छेडा नगर परिसरात हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या एका बुलेटवर तुषार आणि दिव्या तर वरातीत सुमारे १५ बुलेटस्वार सामील झाले. छेडा नगरपासून टिळक नगरपर्यंत ही ‘बुलेटवरात’ काढण्यात आली. (प्रतिनिधी)