Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या एकाच दौऱ्याने कर्मचाऱ्यांच्या अंगावर गणवेश

By admin | Updated: February 7, 2015 23:11 IST

अधिकारी कुठे बसतो, याची माहिती करून घेण्यासाठी गुरुवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागांचा अचानक पाहणी दौरा केला.

ठाणे - महापालिका मुख्यालयातील कारभार कसा चालतो, कोणता अधिकारी कुठे बसतो, याची माहिती करून घेण्यासाठी गुरुवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागांचा अचानक पाहणी दौरा केला. परंतु, या वेळी जे गेल्या कित्येक वर्षांपासून आपला कार्यालयीन गणवेश घालत नव्हते, असे कर्मचारी मात्र आयुक्तांच्या एकाच दौऱ्यामुळे चांगलेच वठणीवर आले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवलेले गणवेश अचानक परिधान केले आणि ते आयुक्तांच्या पुढे हजर झाल्याने त्यांच्या विभागाचे अधिकारी मात्र चांगलेच चक्रावून गेले होते. ठाणे महापालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालये, पाण्याचे जलकुंभ, उद्यान, कळवा रुग्णालय आदींसह इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खाकी रंगाचा कार्यालयीन गणवेश हा सक्तीचा आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांनी हा गणवेश बासनात गुंडाळून ठेवला आहे. काहींचा तर हा गणवेश कार्यालयात असतो, परंतु तो कपाटातील एका खणात असतो. एखाद्या वेळेस पालिका आयुक्त अथवा उपायुक्तांचा दौरा झाला तरच हा गणवेश बाहेर येत असल्याचेही चित्र दिसत होते. त्यामुळे हा गणवेश सक्तीचा करण्यासाठी मागील वर्षी उपायुक्त मुख्यालय संदीप माळवी यांनी तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत, त्यांचा धुलाईभत्ता बंद केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, त्यानंतरदेखील जे गणवेश परिधान करीत नसतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार, मागील वर्षी सुमारे १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा धुलाईभत्ता रोखून धरण्यात आला होता. त्यानंतर, काही कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करण्यास सुरुवात केली. परंतु, पुन्हा ही कारवाई थंडावल्याने गणवेशदेखील पुन्हा गायब झाले होते. (प्रतिनिधी)४दरम्यान, गुरुवारी पालिका आयुक्त जयस्वाल यांनी मुख्यालयातील विविध विभागांचा पाहणी दौरा केला, तेव्हा अचानक प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अंगावर कार्यालयीन गणवेश आला. त्यामुळे त्या-त्या विभागाचे अधिकारीदेखील आश्चर्यचकित झाले. परंतु, आता नव्याने पुन्हा परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली असून येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.