Join us

विनापरवाना बंदूक बाळगणारा अटकेत

By admin | Updated: October 7, 2014 23:04 IST

विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेबाबत लक्ष आहे. तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

कर्जत : विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेबाबत लक्ष आहे. तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. तालुक्यातील गावठी दारु विक्रेते, जुगार अड्ड्यांवर, विनापरवाना चायनीज स्टॉल आदिंवर कर्जत पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अनेक गुन्हे दाखल होत असताना विना परवाना गावठी बंदूक बाळगणाऱ्यांवरही कर्जत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रविवारी एका इसमाकडे गावठी बंदूक, शिशाचे छेर्रे, गन पावडर आणि फटाक्यांची दारु असा दोन हजार सातशे दहा रुपयांचा ऐवज सापडला आहे.कर्जत तालुक्यातील पाचखडक, ठाकूरवाडी, रजपे येथील एका इसमाकडे विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक आहे, अशी खबर मिळाली होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, सहाय्यक फौजदार एस. एस. शिंदे, पोलीस डी. के. म्हात्रे, पोलीस हवालदार जे. आर. म्हात्रे, पोलीस शिपाई डी. सी. सहाने हे खाजगी गाडीने पाचखडक, ठाकूरवाडी रजपे येथे गेले. त्यानुसार माहिती मिळालेल्या घराची झडती घेतली असता तेथे राहत असलेल्या पांडू धर्मा बांगारे यांच्या घराच्या माळावर एक गावठी ठासणीची बंदूक, एक लोखंडी रॉड, तीनशे ग्रॅम शिशाचे छेर्रे, चाळीस ग्रॅम गन पावडर आणि फटाक्यांची दारु असा २ हजार ७१० रुपये किंमतीचा माल त्यांनी हस्तगत केला.पांडू धर्मा बांगारे (४५) यांच्या घरात विनापरवाना हत्यार सापडले म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार डी. के. म्हात्रे यांनी बांगरे यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)