Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भावचिन्हे आता युनिकोडमध्ये!

By admin | Updated: July 16, 2016 03:30 IST

महाराष्ट्र शासनाने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केल्यामुळे सांगीतिक लिपी, वडापाव, छत्रपती शिवरायांची

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केल्यामुळे सांगीतिक लिपी, वडापाव, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा अशा भावचिन्हांना प्रमाणित संकेतांक मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ‘युनिकोड’ सदस्यत्वामुळे मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपिचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित स्थान प्राप्त होणार असून, युनिकोड संदर्भातील भविष्यवेधी जागतिक चर्चेमध्ये शासनाच्या मताला मूल्य प्राप्त होईल. शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्थेला हे सदस्यत्व प्राप्त झाले असल्याने मराठी भाषा आणि देवनागरी लिपीबद्दलच्या तंत्रज्ञानात्मक गरजा ‘युनिकोड’च्या सदस्य कंपन्यांना कळविणे शासनाला सहज शक्य होणार आहे. शिवाय, नामांकित सदस्य कंपन्या नव्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती करताना शासनाने दिलेल्या गरजांचा संदर्भ लक्षात घेतील. युनिकोडचे सदस्यत्व प्राप्त करणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या विविध चिन्हांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित मान्यता मिळविण्यासाठी मराठी जनतेनेही या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा आणि निवडक लिपिचिन्हे व भावचिन्हे शासनाकडे पाठवावीत, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)