Join us  

असह्य चटक्यांना उन्हाळी आजारांची ‘साथ’!, वाढत्या तापमानाने मुंबईकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:04 AM

कमालीची थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे उन्हाळी आजारांनी डोके वर काढले आहे.

मुंबई : कमालीची थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे उन्हाळी आजारांनी डोके वर काढले आहे. वेळीच काळजी न घेतल्यास दिवसागणिक या आजारांचे प्रमाण वाढणार असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, ग्लानी येणे, कणकण जाणवणे, पित्त वाढणे, डोकेदुखी अशा अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.असह्य उकाड्यामुळे रोज लांबचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग पित्त वाढणे, काम करण्याची इच्छा न होणे, मळमळ होणे, पोटामध्ये बिघाड होण्याने त्रस्त आहे. त्यावर उपाय म्हणून दिवसाला किमान दोन ते अडीच लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पाणीयुक्त फळे, लिंबूपाणी, पन्हे आणि ताक या पदार्थांचे सेवन करीत राहिल्यास शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो. त्याबरोबरच बाहेरील तेलकट, तुपकट पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पोट खराब होणे, पित्त वाढण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात भूक मंदावते त्यामुळे कित्येक जण दुपारचे जेवण टाळतात; मात्र खाणे हे आरोग्यासाठी लाभकारी आहे, असे डॉ. वृषाली नायर यांनी सांगितले.पारंपरिक पेयांना प्राधान्य द्या!उन्हाळ्यात पारंपरिक पेयांना प्राधान्य द्यावे. यामध्ये पुदिना अत्यंत गुणकारी असून रोजच्या पाण्याच्या बाटलीमध्ये पुदिन्याची पाने टाकावीत. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या शरीराला पाण्याबरोबरच पुदिन्याचा थंडावा मिळेल. रोजच्या आहारातील चहाचे प्रमाण कमी करावे. गूळ आणि पाणी हे शरीरासाठी अतिशय लाभकारक आहे. त्वचेवरील संसर्ग होण्याचा धोकाही या दिवसांमध्ये अधिक असतो. आजारांवर बचाव म्हणून खूप पाणी पिणे, बाहेरील पदार्थ टाळणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे याचा अवलंब केला तर उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली जाऊ शकते, असे आहारतज्ज्ञ डॉ. शोभा वायदंडे यांनी सांगितले.सरासरी तापमानात वाढमराठवाडा, विदर्भाच्या काही भागात तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.मुंबई दोन दिवस ‘चाळिशीपार’च२६ ते २९ मार्चदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ४२, २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता सांताक्रुज वेधशाळेत ३६.७, तर कुलाबा वेधशाळेत ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या वातावरणातील कोरडेपणा वाढत आहे.

टॅग्स :मुंबई