Join us  

अभिमानास्पद... दक्षिण मुंबईतील शाही इमारती जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 4:07 PM

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वाधिक वास्तू असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई: दक्षिण मुंबईतील  व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय यांचा समावेश आहे. बहरीनमध्ये सध्या सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जागतिक वारसा स्थळांमध्ये सर्वाधिक वास्तू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बहरीनमधील मनामात युनोस्कोची बैठक सुरू आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी अजंठा, एलिफंटा, वेरूळमधील लेण्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात झाला आहे. 

19 व्या आणि 20 व्या शतकातील इमारतींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. यामध्ये उच्च न्यायालय, जुनं सचिवालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या वास्तूंना जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग आणि इरॉस व रिगल सिनेमा हॉल यांचा समावेशही जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालय