Join us

कुर्ला येथे चाळीसह बेकारीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुर्ला पश्चिमेकडील कुर्ला पोलीस स्टेशन लेनलगत असलेल्या चाळीसह बेकरीला मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील कुर्ला पोलीस स्टेशन लेनलगत असलेल्या चाळीसह बेकरीला मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

मुळात येथील परिसर दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येच्या घनतेचा आहे. येथे मोठ्या प्रमाणावर जुन्या चाळी असून, होलसेल व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. येथील रस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे आगीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आग लागलेला परिसर बैठ्या चाळीचा असतानाच, आसपासची घरेही लोखंडी पत्रे आणि कच्च्या साहित्याने बांधलेली असल्याने, त्यांनाही या आगीची झळ मोठ्या प्रमाणात बसली. मुंबई अग्निशमन दलाकडून येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम वेगाने सुरू असतानाच, स्थानिक रहिवाशांनीही आग शमविण्यासाठी अग्निशमन दलाला मदत केली. येथील आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य जळाल्याने आगीच्या धुराचे लोट दुरूनही दिसत होते.