मुंबई : गावगाड्याबाहेरच राहणाऱ्या, कुठलेही हक्काचे स्थान नसणाऱ्या अस्पृश्याहूनही अस्पृश्य, दलितांहूनही दलित अशा भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना समाजाने आधी समजून घेतल्या पाहिजेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी मांडले.पत्रकार प्रशांत पवार यांच्या ‘३१ आॅगस्ट १९५२’ या भटक्या-विमुक्तांच्या संशोधनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी गायकवाड यांनी भटक्या - विमुक्तांना कधीच समाजाने स्वत:मध्ये सामावून घेतले नाही. त्यामुळे ते कायम अनेक हक्कांपासून, सुविधांपासून वंचित राहिले. त्यांचा हुंकार लेखणीतून तेही पारदर्शीपणे आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना आज एक देश तयार होऊ शकेल इतकी भटक्या-विमुक्तांची संख्या देशात आहे. त्यांच्या बुरसटलेल्या परंपरा, त्यातून स्त्रीचे होणारे शोषण, जातपंचायती बरखास्त करून त्याऐवजी समाज विकास समित्यांची स्थापना करणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. या वेळी प्रज्ञा पवार यांनीही पुस्तकाचे विश्लेषण करीत पुस्तकातील स्त्रीपात्रांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)