Join us  

पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत जलबोगदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:47 AM

मुसळधार पावसाने यंदा मुंबईला दणका दिला. अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

मुंबई : मुसळधार पावसाने यंदा मुंबईला दणका दिला. अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबापुरीच्या पुरातून सुटका करण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत जलबोगदे तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. हे साठलेले पाणी नंतर समुद्रात सोडले जाणार आहे. टोकियो शहराच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे जपानी कंपनीने सोमवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या दालनात सादरीकरण केले.शहराची भौगोलिक स्थिती आणि समुद्राला भरती असल्यास मुंबई मुसळधार पावसात पाण्याखाली जाते. या वर्षी पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी टोकियोमध्ये राबविण्यात येणारा ‘भूमिगत जलबोगदा’ उपक्रम मुंबईतही राबविण्याबाबत पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. या कामाचा अनुभव असलेल्या जपानी कंपनीच्या अधिकारी-तज्ज्ञांनी या प्रकल्पाची माहिती दिली.या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त राजीव कुकुनूर, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे, जपानमधील संबंधित संस्थेचे महाव्यवस्थापक योशिताका तोयोसू, तंत्रज्ञान व्यवस्थापक ताकेशी आदी अधिकारी उपस्थित होते.भूमिगत जलबोगद्यात साठविलेले पाणी समुद्रात सोडण्याच्या पर्यायाबरोबरच पिण्यासाठी वापरता येऊ शकते का? याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.>मिठी नदी, तलावांचा दौरा...भूमिगत जलबोगदा उपक्रमासाठी जपानच्या कंपनीचे तज्ज्ञ पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पवई, विहार, तुळशी तलाव आणि मिठी नदीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या अभ्यास दौºयाचा अहवाल पालिकेला सादर करण्यात येणार आहे.>यासाठी प्रकल्पाला प्राधान्य...अनेक उपाययोजना केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबतेच. त्यामुळे जगभरात राबविल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा पालिकेने घेतला. यामध्ये जपानमधील टोकियो शहर, जलबोगदा प्रकल्पामुळे पूरमुक्त झाल्याचे आढळून आले.