Join us

वाळीत प्रकरणे दुर्दैवी

By admin | Updated: February 4, 2015 02:29 IST

२१ व्या शतकात वाळीत टाकण्याचे प्रकार होणे, ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केली़

मुंबई : २१ व्या शतकात वाळीत टाकण्याचे प्रकार होणे, ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केली़ वाळीत टाकण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी न्यायालयाने वेळोवळी आदेश दिले आहेत़ तरीही हे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत़ अलिबाग येथील जगन्नाथ वाघरे यांना त्यांच्या समाजाने २००७ साली वाळीत टाकले़ यातील आरोपींवर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले़महत्त्वाचे म्हणजे वाघरे यांना निनावी धमकी येत असून याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. त्यामुळे याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी अ‍ॅड़ गायत्री सिंग यांनी याचिकाकर्त्यांतर्फे केली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला़यावेळी अलिबागच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी येथील वाळीत प्रकरणाचा तपशील न्यायालयाला दिला़ येथे एकूण २८ वाळीत प्रकरणे घडली आहेत. याबाबत खटले भरण्यासाठी शासनाने प्रस्ताव पाठवलेला आहे़ त्याचे प्रत्युत्तर अद्याप आलेले नसल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर वाघरे यांच्या प्रकरणातील आरोपींना तडीपार करण्यासंदर्भात तसेच या प्रस्तावांबाबत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असेही आदेश खंडपीठाने दिले़ (प्रतिनिधी)च्मुंबईपासून अवघ्या शंभर किमी अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये अशा घटना घडत असून किमान आता तरी राज्य शासनाने यावर ठोस उपाय योजना करायला हव्यात. आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे़ च्तेव्हा राजकीय पाठबळ असणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडथळा येऊ शकेल, असे आम्हाला वाटत नाही़ त्यामुळे शासनाने याप्रकरणांची गंभीर दखल घ्यायाला हवी, असे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले़