Join us

बेशिस्त रिक्षाचालकांवर बडगा

By admin | Updated: November 21, 2014 01:15 IST

आरटीओने आपल्या हद्दीतील आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तब्बल ६७ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे

पनवेल : आरटीओने आपल्या हद्दीतील आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तब्बल ६७ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच राबविलेल्या या विशेष तपासणीत आरटीओने एकूण एक हजार ७८५ आॅटो रिक्षांची तपासणी केली. यात दोषी आढळलेल्या ६७ आॅटो रिक्षांपैकी २१ आॅटोरिक्षा जप्त केल्या, तसेच त्यांच्याकडून तब्बल ९७ हजार ७१८ रुपयांचा दंडदेखील वसूल केला आहे. रिक्षाची सेवा मीटरनुसार न देणे, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, स्क्रॅप झालेल्या रिक्षा अवैधरीत्या चालवणे आदी तक्रारी पनवेल आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने पनवेलचे आरटीओ अधिकारी अरुण मेवला यांनी आपल्या हद्दीतील सर्व आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. ही तपासणी नवी मुंबई वाहतूक शाखा तसेच इतर शासकीय यंत्रणांच्या मदतीने राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरटीओ तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सकाळ व सायंकाळच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बसस्टँड व आजूबाजूच्या परिसरातील तब्बल एक हजार ७८५ रिक्षांची तपासणी करण्यात आल्याची माहिती पनवेलचे आरटीओ अधिकारी अरुण मेवला यांनी दिली. आरटीओच्या वतीने आतापर्यंत २१५१ स्क्रॅप आॅटोरिक्षांचे जेसीबीने तुकडे करून त्या भंगारात काढल्या आहेत. परवाना निलंबनाची कारवाई होणार आहे. (वार्ताहर)