गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईमुंबई उपनगरांमध्ये सध्या अनधिकृतपणे नळजोडण्या करणाऱ्या प्लंबर्सनी थैमान घातले आहे. पालिकेच्या अधिकृत रकमेच्या पावपट रक्कम आकारून हे प्लंबर्स निशाचराप्रमाणे बाहेर पडून पाण्याचे नवीन कनेक्शन अनधिकृतपणे देत आहेत. परिणामी अनधिकृत कनेक्शन्सना धो-धो पाणी मिळत असून, पालिकेचे अधिकृत ग्राहक मात्र पाणी येत नसल्याची तक्रार घेऊन पाण्यासाठी स्थानिक पालिका कार्यालयात हेलपाटे घालताना दिसत आहेत. मात्र प्लंबर्सविरोधात अधिकृत तक्रारी येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अशक्य होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. जल विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नळ जोडणीचा परवाना नसणाऱ्या या तथाकथित प्लंबर्स (ज्यांना प्लंबिंगचे काहीच ज्ञान नाही)ची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनधिकृत जलवाहिन्यांचे जाळेही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. मुख्य म्हणजे नवीन कनेक्शन जोडण्याचे काम हे लोक इतक्या शिताफीने करतात, की स्थानिकांसह पालिका अधिकाऱ्यांचाही गोंधळ उडत आहे. अप्रशिक्षित लोकांकडून पाण्याचे कनेक्शन जोडले जात असल्याने अनेकदा ते तुटते आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाते. मात्र याविरोधात तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नसल्याने त्यावर अंकुश ठेवणे कठीण होत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
‘तथाकथित’ प्लंबर्सकडून अनधिकृत नळजोडण्या
By admin | Updated: April 1, 2015 00:38 IST