मुंबई: शाळेसाठी राखीव असलेल्या चेंबूरच्या वाशी नाका येथील एमएमआरडीएच्या भूखंडावर पार्किंग माफियांनी कब्जा करुन याठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरु केले आहे. याबाबत पालिकेसह, एमएमआरडीए आणि पोलिसांना अनेक तक्रारी करुन देखील या माफियांवर कारवाई होत नसल्याने मनसेने याठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात विविध प्रकल्पबाधित असलेल्या झोपडीधारकांचे एमएमआरडीएने चेंबूर वाशीनाका येथील म्हाडा आणि एमएमआरडीए वसाहतीत पुनर्वसन केले आहे. याठिकाणी म्हाडा आणि एमएमआरडीच्या ६०पेक्षा अधिक इमारती आहेत. यात लाखो रहिवाशी राहत आहेत. एमएमआरडीएने या झोपडीधारकांना याठिकाणी केवळ इमारती बांधून दिल्या. मात्र त्यांनाकुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक राहत असतानाही या परिसरात एकही पालिकेची शाळा नाही. त्यामुळे येथील मुलांना चेंबूर कॅम्प परिसरांत असलेल्या पालिका शाळेत जावे लागते. अथवा येथील काही खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. मात्र या खासगी शाळांची फी आवाक्याबाहेर असल्याने अनेक मुलांनी मध्येच शाळा सोडून दिल्या आहेत.शाळेचा प्रश्नमार्गी लागावा, यासाठी रहिवाशांनी शासनाकडे अनेकदा मागणी केली आहे. एमएमआरडीएने याठिकाणी एक मोकळा भूखंड शाळेसाठी राखीव ठेवला आहे. मात्र कित्येक वर्षांपासून पालिकेला येथे शाळेसाठी मुहूर्त सापडलेला नाही. काही रहिवाशांच्या मते या परिसरात येथील एका नगरसेवकाच्या अनेक खासगी शाळा आहेत. पालिकेने शाळा उभारल्यास या शाळेत कोणीही जाणार नाही. त्यामुळेच येथे पालिकेची शाळा उभारण्यास अडचण आहे. पर्यायाने गेल्या अनेक वर्षांपासून शाळेसाठी राखीव असलेला भुखंड असाच पडून आहे. शाळेसाठीच्या या राखीव मैदानावर एका माफियाने कब्जा करुन अनधिकृत पे अॅन्ड पार्किंग सुरु केले आहे. यातून दररोज चार ते पाच हजारांची कमाई होत आहे. हा सर्व प्रकार विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नेते आणि काही पोलिसांना देखील माहित आहे. त्या-त्या मंडळींना त्यांचा हिस्सा मिळत असल्याने कुणीही या अनधिकृत पार्किंगबाबत आवाज उठवलेला नाही. (प्रतिनिधी)
पार्किंग माफियांची अनधिकृत पे-पार्किंग
By admin | Updated: November 10, 2016 04:01 IST