Join us

चेंबूरमधील कार विक्रेत्यांचे अनधिकृत पार्किंग

By admin | Updated: January 2, 2015 00:30 IST

एखाद्या सामान्य वाहनचालकाने काही मिनिटांसाठी जरी रस्त्यावर आपले वाहन उभे केल्यास वाहतूक पोलीस या वाहनांवर कारवाई करून त्यांना दंड आकारतात.

चेंबूर : एखाद्या सामान्य वाहनचालकाने काही मिनिटांसाठी जरी रस्त्यावर आपले वाहन उभे केल्यास वाहतूक पोलीस या वाहनांवर कारवाई करून त्यांना दंड आकारतात. मात्र चेंबूरमधील अनेक मुख्य रस्त्यांलगत काही जुन्या कार विक्रेत्यांनी संपूर्ण फुटपाथ काबीज करून त्यावर अनधिकृत पार्किंग केली आहे. याच ठिकाणी त्यांच्याकडून वाहने विक्रीचा व्यवसाय होत असताना या अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलीस मात्र कानाडोळा करीत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील सर्व रस्त्यांलगत कामे सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चेंबूरमधील सायन-ट्रॉम्बे रोड हादेखील नेहमीच वाहतूककोंडीत अडकलेला असतो. या मार्गावरून दिवस-रात्र लाखो वाहने मुंबई आणि पनवेलच्या दिशेने ये-जा करत असतात. त्यातच चेंबूरमध्येदेखील अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पोलिसांमार्फत नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र काही वेळा काही वाहनचालक कामासाठी आपली वाहने रस्त्यालगत उभी करून काम करण्यासाठी जातात. याच दरम्यान वाहतूक पोलीस ही वाहने उचलून पोलीस चौकीला घेऊन जातात. त्यानंतर मोटारसायकल असेल तर दोनशे रुपये दंड आणि चारचाकी वाहन असेल तर पाचशे ते सहाशे रुपये दंड अशा प्रकारे वाहतूक पोलीस वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात.मात्र, चेंबूरमधील काही जुने कारविक्रेते वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत रस्त्यावरच आपली वाहने विक्रीसाठी ठेवत आहेत. पूर्वी हे कारविक्रेते त्यांच्या दुकानासमोरच चार ते पाच कार लावत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कारचालकांचा धंदा तेजीत असल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांना हाताशी धरून रस्त्यालगत कार विक्रीसाठी उभ्या करायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर या कारविक्रेत्यांनी संपूर्ण फुटपाथ अडवून त्यावर कार विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यामुळे हे फुटपाथ पादचाऱ्यांसाठी बनवण्यात आले आहेत की या कार विक्रेत्यांसाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. (प्रतिनिधी) चेंबूरमधील काही जुने कारविक्रेते वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत रस्त्यावरच आपली वाहने विक्रीसाठी ठेवत आहेत. पूर्वी हे कारविक्रेते त्यांच्या दुकानासमोरच चार ते पाच कार लावत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कारचालकांचा धंदा तेजीत असल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांना हाताशी धरून रस्त्यालगत कार विक्रीसाठी उभ्या करायला सुरुवात केली आहे.