Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाऊच्या धक्क्यावर बोटींची अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील पहिले बंदर अशी ओळख असलेल्या भाऊच्या धक्क्यावर सध्या बोटींच्या अनधिकृत पार्किंगला ऊत आला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील पहिले बंदर अशी ओळख असलेल्या भाऊच्या धक्क्यावर सध्या बोटींच्या अनधिकृत पार्किंगला ऊत आला आहे. येथे केवळ प्रवासी बोटींना परवानगी असताना, मालवाहू बोटीही उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे पोर्ट ट्रस्टचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

कोरोनापूर्व काळात भाऊच्या धक्क्यावरून प्रतिदिन १५ हजार प्रवासी ये-जा करायचे. मात्र, सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीसंख्या रोडावली आहे. पावसाळी हंगामामुळे रेवसची सेवा बंद असून, मोरा बंदराला जाणाऱ्या केवळ १० फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवासी बोटी किनाऱ्यालगत उभ्या करण्यात आल्या आहेत. ही संधी साधून प्रवासी बोटींच्या मागे अनधिकृतरित्या मालवाहू बोटी उभ्या करण्यात येत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या फेरीबोटी वगळता अन्य कोणत्याही बोटींना फेरी वार्फवर (भाऊचा धक्का) प्रवेश करण्याची परवानगी नाही. मात्र, नियम पायदळी तुडवून सर्व प्रकारच्या बोटींना प्रवेश दिला जात आहे.

भाऊच्या धक्क्यावर उभ्या राहणाऱ्या किंवा येथून रवाना होणाऱ्या प्रत्येक बोटीची नोंद पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयात होत असते. धक्क्यावर प्रवेशासाठी आणि बोटी पार्क करण्यासाठी शुल्कही आकारले जाते. हे शुल्क आकारताना संबंधित अधिकारी बोटींची तपासणी करीत नाहीत का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी उपस्थित केला. भाऊचा धक्का हा केवळ प्रवासी बोटींकरीता आरक्षित आहे. असे असताना तेथे मालवाहू बोटी येतातच कशा, अधिकाऱ्यांना नियम माहिती नाहीत, की त्यांच्याच आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

* पावसाळ्यात बंदराला धोका

मोठ्या बोटी भाऊच्या धक्क्यावर अनधिकृतपणे उभ्या करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. पावसाळ्यात त्याचा बंदराला सर्वाधिक धोका आहे. कारण, हायटाईडवेळी लाटांच्या माऱ्यामुळे या बोटींचा हौदा बंदराला इतक्या जोरात आढळतो की, तिकीट काऊंटरपर्यंत कंपने जाणवतात. अशाप्रकारे सातत्याने हादरे बसत राहिल्यास पावसाळ्यात बंदराला धोका आहे. मात्र, अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याची माहिती भाऊच्या धक्क्यावरील सूत्रांनी दिली.

...........................................................................