अजित मांडके, ठाणेमोबाइल टॉवरच्या रेडिएशनचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना आजही महापालिका हद्दीत ६०२ अनधिकृत मोबाइल टॉवर असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे. दुसरीकडे कर विभागाने शहरात ६५१ अनधिकृत मोबाइल टॉवर असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांत ताळमेळ नसल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आलेल्या अधिसूचनेनुसार यातील बहुतेक मोबाइल टॉवर आता अधिकृत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या १५ दिवसांत प्रत्येक टॉवरचा रेडिएशन आॅडिट रिपोर्ट सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण विभागाच्या सर्व्हेनुसार शहरात ६०२ मोबाइल टॉवर असून, त्यापैकी एकच टॉवर अधिकृत आहे. यामध्ये सर्वांत अधिक मोबाइल टॉवर हे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत असून, येथे १०० टॉवर आहेत. त्याखालोखाल उथळसरमध्ये ७७, वर्तकनगर ७१, प्रभाग ६३, ६४, ६५मध्ये ५४, रायलादेवी ४७, वागळे ४३, कळवा ४४ आणि कोपरीत ३४ अनधिकृत मोबाइल टॉवर आहेत. यापैकी ४०६ मोबाइल टॉवरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २४१ टॉवर तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाच जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पाच जणांनी स्वत:हून टॉवर तोडले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे. परंतु, दुसरीकडे कर विभागाच्या माहितीनुसार, शहरात ६५१ मोबाइल टॉवर असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांत ताळमेळ नसल्याची बाब समोर आली आहे.दरम्यान, दुसरीकडे आता शहर विकास विभागाकडून शहरातील सर्वच मोबाइल टॉवरना नोटिसा बजावल्या असून, शासनाच्या अधिसूचनेनुसार हे टॉवर अधिकृत करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. परंतु, अद्याप एका कंपनीनेही तशी माहिती दिलेली नसल्याची माहिती शहर विकास विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या अधिसूचनेनुसार दोन इमारतींमधील अंतर, रेडिएशन, झोपडपट्टी आदींसह ज्या ठिकाणी टॉवर उभारला असेल त्या इमारतीची क्षमता आहे अथवा नाही, हेसुद्धा तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ ३० हजारांचा दंड आकारून मोबाइल टॉवर आता नियमित म्हणजेच अधिकृत होणार आहेत. तसेच शहर विकास विभागाने प्रत्येक कंपनीकडे त्यांनी स्वत:हून उभारलेल्या टॉवरची माहिती मागवली आहे. त्यांनी जर चुकीची माहिती पालिकेला दिली तर उर्वरित टॉवरवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत मोबाइल टॉवरचा विळखा
By admin | Updated: June 13, 2014 01:13 IST