नवी मुंबई : निवडणुका संपल्यापासून शहरात अनधिकृत होर्डिंगबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महापौर, उपमहापौरांसह विरोधी पक्षनेत्यांना शुभेच्छा देण्यासाठीही अनधिकृत होर्डिंग लावले असून महापालिकेचे अधिकारी नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेत आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु नवी मुंबईमधील राजकीय नेते, कार्यकर्ते व महापालिकेचे अधिकारी या नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शहराचा विकास करण्याची व विद्रूपीकरण थांबविण्याची जबाबदारी असलेल्या महापौर सुधाकर सोनावणे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभाग व चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या होर्डिंगसाठी कोणतीही परवानगी घतलेली नाही. प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनीच कायद्याचे उल्लंघन केले तर इतर नागरिक नियम कसे पाळतील, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. महापौरांसह उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांना शुभेच्छा देण्यासाठीही अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. तुर्भेमध्ये सामान्य शिवसैनिकांनी लावलेल्या होर्डिंगविषयी पोलिसांनी चक्क गुन्हा दाखल केला. त्यामुळे या दुटप्पी भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
महापौरांनाही ‘अनधिकृत’ शुभेच्छा
By admin | Updated: May 12, 2015 03:29 IST