Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत प्रवेशद्वारांचा शॉर्टकट

By admin | Updated: August 4, 2014 00:37 IST

पादचारी पूल असतानाही रूळ ओलांडणे, रुळांलगत असलेल्या संरक्षक भिंती पाडून रूळ ओलांडण्याचा दुसरा मार्ग पत्करणे, अशा आणि अन्य कारणांमुळे प्रवाशांना रेल्वे अपघातांना तोंड द्यावे लागते

मुंबई : पादचारी पूल असतानाही रूळ ओलांडणे, रुळांलगत असलेल्या संरक्षक भिंती पाडून रूळ ओलांडण्याचा दुसरा मार्ग पत्करणे, अशा आणि अन्य कारणांमुळे प्रवाशांना रेल्वे अपघातांना तोंड द्यावे लागते. सुविधा असतानाही काही रेल्वे स्थानकांत किंवा त्या परिसरात खुद्द प्रवासी किंवा झोपडपट्टीवासीयांकडून अनधिकृत प्रवेशद्वारे करण्यात आली आहेत. या प्रवेशद्वारांतून प्रवासी आणि झोपडपट्टीवासीयांनी स्थानकात येण्यासाठी किंवा पलीकडील बाजूस जाण्यासाठी अशा प्रकारे एक ‘अधिकृत’ प्रवेश शोधला असून त्याचा मोठ्या संख्येने वापर केला जात असल्याचे एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या २०१३ च्या सर्वेक्षणानुसार) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात हार्बर मार्ग आघाडीवर असून गोवंडी, चेंबूर, जीटीबी, नेरुळ, वाशी रेल्वे स्थानक आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवेशव्दार आणि प्रवासी संख्या आहे. त्यानंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मेन लाईनचा नंबर लागतो. या तीनही रेल्वे मार्गावरील मोजक्या ३७ स्थानकांचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेक्षणातून अशा स्थानकांवर आणि त्या परीसरात पादचारी पुल, सरकते जिने तसेच अनधिकृत प्रवेशव्दार बंद करण्याच्या उपायांबरोबरच रेल्वे पोलिसांकडून मज्जाव करण्याचा पर्याय रेल्वेकडून शोधला जाणार आहे. प्रत्येक स्थानक आणि त्या दरम्यान गर्दीच्या वेळी १४ तासांचे सर्व्हेक्षण एमआरव्हीसी आणि एका खासगी संस्थेकडून करण्यात आले, असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)