Join us

त्या अनधिकृत बांधकामाला पालिकेचे अभय? कारवाई थांबवली

By admin | Updated: May 27, 2014 23:03 IST

अनधिकृत बांधकामाला अभय देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपाखाली गणेश बोराडेंना पोलीस कोठडीची हवा खायला लागली असताना त्याच बांधकामाला कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून पुन्हा अभय लाभल्याचे मंगळवारी दिसून आले. त्या बांधकामावर सुरू करण्यात आलेली कारवाई अचानक थांबवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याण : अनधिकृत बांधकामाला अभय देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपाखाली गणेश बोराडेंना पोलीस कोठडीची हवा खायला लागली असताना त्याच बांधकामाला कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून पुन्हा अभय लाभल्याचे मंगळवारी दिसून आले. त्या बांधकामावर सुरू करण्यात आलेली कारवाई अचानक थांबवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केडीएमसी मुख्यालयाच्या बाजूकडील शंकरराव चौकातील एका दुकानाच्या नूतनीकरणाच्या विनापरवानगी सुरू असलेल्या कामाबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यावर एमआरटीपी कारवाई टाळण्यासाठी संबंधित दुकानमालकाकडे लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता स्वीकारणारे तत्कालीन क प्रभाग क्षेत्र अधिकारी बोराडे यांना लाचलुचपत विरोधी पथकाने १ फेब्रुवारीला अटक केली. दरम्यान, या बांधकामावरील कारवाईला केडीएमसी प्रशासनाला तब्बल तीन महिन्यांनी मुहूर्त सापडला़ त्यानुसार मंगळवारी कारवाईसाठी प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईला सुरुवातही केली़ परंतु ती अचानक थांबविण्यात आली. यामुळे केडीएमसीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईला अभय दिल्याचा आरोप फेटाळून लावला असून संबंधित दुकानदाराने केलेल्या निवेदनावरून त्यास दुकानातील किमती सामान काढण्याची दोन दिवसांची मुदत वरिष्ठांच्या आदेशावरून दिल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यावर माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी नाराजी व्यक्त केली असून इतरांना अशी मुदत पालिका देते का? असा सवाल केला आहे. अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाणार असून वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी/ प्रशांत माने)