मुंबई : न्यायालयाचे फटकारे आणि पालिकेच्या कारवाईनंतरही मुंबईत जोरदार बॅनरबाजी सुरू आहे़ नववर्षाच्या मुहूर्तावर नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे़ त्यामुळे मुंबई बॅनरमुक्त करण्याच्या पालिका आयुक्तांच्या संकल्पाची ऐन नववर्षातच होळी झाली आहे़आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुंबई बॅनरमुक्त करण्याचा संकल्प अर्थसंकल्पातून केला होता़ मुंबईतील बॅनरबाजीची उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतल्यामुळे पालिकेच्या कारवाईला बळ मिळाले़ त्यानुसार प्रशासनाने राजकीय बॅनर्सवर बंदी आणणारे धोरणही तयार केले़ मात्र हे धोरण निवडणुकीच्या काळात लटकले ते आजतागायत़मात्र बेकायदा बॅनर्स काढण्यात दिरंगाई करणाऱ्या महापालिकांना बरखास्त करण्याचा सज्जड दम उच्च न्यायालयाने आॅगस्ट महिन्यात भरला़ तेव्हापासून नोव्हेंबर अखेरीपर्यंत पालिकेने ४८०० बॅनर्स खाली उतरविले आहेत़ मात्र निवडणुकीनंतर धन्यवाद आणि शुभेच्छांचे तसेच आता नववर्षाच्या स्वागताचे बॅनर्स शहरभर झळकतच आहेत़ (प्रतिनिधी) तक्रारीसाठी हेल्पलाइनबेकायदा बॅनर्सबाबत तक्रार करण्यासाठी पालिकेने १२९२ आणि १२९३ हे दोन टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत़ कारवाईतील मोठी अडचणआजच्या घडीला सायन, साकीनाका, दादर, कांदिवली, पवई, घाटकोपर या ठिकाणी नववर्षाच्या शुभेच्छांचे बॅनर्स लागले आहेत़ मात्र अनेक वेळा गल्लीबोळातील छोटे-मोठे कार्यकर्ते नेत्याला खूश करण्यासाठी असे बॅनर्स लावत असतात़ त्यामुळे कारवाई कोणावर करायची, असा पेच पालिकेपुढे होता़ यावर तोडगा काढत संबंधित राजकीय पक्षाच्या स्थानिक गटावर कारवाई करण्याची सूचना न्यायालयाने केली होती़राजकीय शुभेच्छांची डोकेदुखीनेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी, नियुक्त्या अथवा सण-उत्सवाच्या शुभेच्छा, मेळावे अशी राजकीय पक्षांची जाहिरातबाजी शहरभर सुरू असते़ राजकीय व व्यावसायिक होर्डिंग्ज, बॅनर्ससाठी पालिका ठरावीक शुल्क आकारते़ मात्र हे शुल्क कमी असतानाही राजकीय पक्षांच्या बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर्स उभे राहण्याचे प्रमाण अधिक आहे़ राजकीय बॅनरबंदी लटकलीराजकीय बॅनर्सवर बंदी आणणारे धोरण दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने तयार केले आहे़ मात्र या धोरणाचा मसुदा कधी प्रशासकीय तर कधी सत्ताधाऱ्यांच्या पटलावर धूळ खात पडला आहे़ या धोरणामुळे राजकीय नेत्यांच्या फुकट प्रसिद्धीचा व चमकेशगिरीचा मार्गच बंद होणार असल्याने या धोरणाबाबत राजकीय पक्ष अनुकूल नाहीत़ या ठिकाणी बॅनरबंदी१बॅनरबाजीने शहर विद्रूप करणाऱ्यांवर पालिका अधिनियम कलम ३२८, ३२८(ए) आणि ४७१ या अंतर्गत कारवाई करण्यात येते़ ३० वर्षांहून जुन्या इमारतींवर बॅनर्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे़ त्याचबरोबर सागरी नियंत्रण क्षेत्र, पुरातन वास्तू व परिसर या ठिकाणी बॅनर्सबाजीवर बंदी आहे़ २पालिकेतील आकडेवारीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत एकूण ३० हजार ८६५ बेकायदा बॅनर्स काढण्यात आले़ यापैकी २४ हजार ३९६ बॅनर्स राजकीय पक्षांचे होते़३जानेवारी ते जुलै २०१४ पर्यंत नऊ हजार २७३ बेकायदा बॅनर्स पालिकेने काढले़ यापैकी पाच हजार ९१३ राजकीय बॅनर्स होते़ निवडणुकीच्या काळात आॅगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत ४८०० बॅनर्स काढण्यात आले़ यापैकी एकट्या सप्टेंबर महिन्यात ३६२८ बॅनर्स काढण्यात आले आहेत़सणासुदीच्या काळात विशेष कारवाईमोठ्या नेत्यांचे वाढदिवस, सण, उत्सवाच्या काळात राजकीय बॅनरबाजी रंगात येते़ त्यामुळे अशा विशेष दिवशी कारवाई तीव्र करण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे़ या कारवार्इंची जबाबदारी संपूर्ण २४ वॉर्डांमधील अनुज्ञापन खात्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर सोपविण्यात आली आहे़
मुंबईत अनधिकृत बॅनरबाजी सुरूच
By admin | Updated: January 1, 2015 01:37 IST