उल्हासनगर : शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी १२७ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींवर गेली आहे. संथगतीने सुरू असलेल्या योजनेवर टीका होत असताना आयुक्तांनी यासंदर्भात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. उल्हासनगर महापालिकेने केंद्र शासनाच्या मदतीने सुरू केलेली पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तिसऱ्या टप्प्यात योजना ३०० कोटींवर गेली आहे. शहरातील जुनी पाणी वितरण व्यवस्था बदलण्यासाठी व मुबलक पाणी मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. १२७ कोटी योजनेची निविदा ४० टक्के वाढीव झाल्याने १६७ कोटींवर गेली होती.योजना ३ वर्षांत पूर्ण होऊन मुबलक पाणी मिळण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेना-भाजपाने दिले होते. वर्ष १९७२ च्या शहर विकास आराखड्यानुसार ही योजना सुरू करण्यात आल्याने त्यात झोपडपट्टीतील जलवाहिन्या टाकण्याचे काम समाविष्ट नव्हते. दुसऱ्या टप्प्यात ७० कोटींच्या निधीतून झोपडपट्टी भागात जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी ३० कोटींचा निधी कमी पडत असल्याचे कंपनीने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पाणी वितरण योजना तिसऱ्या टप्प्यात गेली असून योजनेच्या कामाची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.
उल्हासनगर पाणी योजना ३०० कोटींवर
By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST