Join us

उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा रविवारपासून ठप्प

By admin | Updated: June 2, 2014 23:09 IST

उल्हासनगर -चार वर्षांपूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा रविवारपासून ठप्प पडली आहे.

* आयुक्तांचे ठेकेदारावर कारवाईचे संकेतउल्हासनगर -चार वर्षांपूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा रविवारपासून ठप्प पडली आहे. विविध मागण्या मंजूर न झाल्याने व आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने बस सेवा बंद ठेवल्याची माहिती ठेकेदाराने दिली. उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली. सुरुवातीला एकूण २० बस होत्या. मात्र, तीन वर्षांतच बस सेवेला घरघर लागली असून गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ ४ बस धावत आहेत. ठेकेदाराच्या असहकार्यामुळे पालिकेने परिवहन बस सेवेची नव्याने निविदा काढली असून केस्टल ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला पाठवण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली.परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर पेट्रोल, सुट्या साहित्याच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. मात्र, बसेसच्या तिकिटांत वाढ झाली नसल्याने सेवा नुकसानीत गेल्याचा आरोप करून ठेकेदाराने ती अनेकदा बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. रविवारपासून बस सेवा बंद झाल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांना नव्हती. तसेच तशी सूचनाही ठेकेदाराने पालिकेला दिली नसल्याचे उघड झाले आहे. परिवहन समितीलाही बस सेवा सुरू आहे की नाही, याची माहिती नसून समिती केवळ भत्ता घेण्यासाठीच अस्तित्वात असल्याची टीका होत आहे. महापालिकेने १९ ऑगस्ट २०१३ रोजीच्या पालिका महासभेत परिवहन सेवेचा विषय घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदाराने लाखो रुपयांची रॉयल्टी न भरणे, पालिकेच्या नियम व अटींचे पालन न करणे, बसच्या संख्येत वाढ न करणे, असा ठपका ठेकेदारावर ठेवून नवीन परिवहन ठेकेदार का नियुक्त करू नये, अशी विचारणा करण्यात आली होती. ठेकेदाराने परिवहन सेवा नुकसानीत असल्याचे कारण दिले होते. या बस सेवेत ३०० पेक्षा जास्त कामगार होते. मात्र, ठेकेदाराने बसेसची संख्या हळूहळू कमी केल्याने सध्या चारच बस धावत आहेत. ठेकेदाराने कामगारांची देणी दिली नसल्याने व हाताला काम नसल्याने कामगार मिळेल ते काम करीत असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते अरुण आशान यांनी दिली. सध्या फक्त २० कामगार कामाला असून त्यांच्यावरही बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. (प्रतिनिधी)