Join us
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनियन महिलेला मिळाले भारताचे हृदय, मुलुंडमध्ये झाली शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:55 IST

मुलुंडच्या रुग्णालयात ३२ वर्षीय युक्रेनियन महिला रुग्णाला जयपूरच्या एका युवतीने हृदयदान करून जीवदान दिले आहे. या युवतीच्या पालकांनी तिचे हृदय दान करण्यास संमती दिल्यामुळे, ही शस्त्रक्रिया शक्य झाली.

मुंबई : मुलुंडच्या रुग्णालयात ३२ वर्षीय युक्रेनियन महिला रुग्णाला जयपूरच्या एका युवतीने हृदयदान करून जीवदान दिले आहे. या युवतीच्या पालकांनी तिचे हृदय दान करण्यास संमती दिल्यामुळे, ही शस्त्रक्रिया शक्य झाली. रस्ते अपघातात झालेल्या आघातामुळे ही तरुणी ब्रेनडेड झाली होती. तिच्या नातेवाईकांनी मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाचे दान करण्यास संमती दिल्याने, चार रुग्णांचे जीवन सामान्य होऊ शकणार आहे. ही शस्त्रक्रिया मुंबईतील ५९वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली.जयपूरच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी युवतीला ब्रेनडेड असल्याचे सांगितल्यानंतर, तिच्या पालकांचे देहदानाबद्दल समुपदेशन करण्यात आले, तर केमोथेरपीमुळे डायलेटेड कार्डिओमायोपथीचा विकार झालेल्या ३२ वर्षांच्या युक्रेनियन महिला रुग्णाच्या शरीरासाठी, दान करण्यात आलेले हृदय अनुकूल आहे का? हे तपासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या.या महिलेला असाध्य स्वरूपाचा मायलॉइड ल्युकेमिया झाल्याने, केमोथेरपीची अनेक सत्रे घ्यावी लागली होती. ल्युकेमियातून बाहेर येत असतानाच, या रुग्णामध्ये हृदयक्रिया बंद पडत चालल्याची लक्षणे दिसू लागली. या महिलेची नोंदणी १८ मे रोजी मुलुंड येथील रुग्णालयात तातडीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी करण्यात आली. ती तिच्या नवºयासोबत वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आली.जयपूर ते मुंबई ३ तास १८ मिनिटांतजयपूर आणि मुंबई या दोन शहरांदरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. दान करण्यात आलेले हृदय दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी जयपूरच्या रुग्णालयातून निघाले व ४ वाजून दहा मिनिटांनी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विमानातून ४ वाजून १५ मिनिटांनी मुंबईकडे निघाले. हे हृदय घेऊन येणारी टीम ५ वाजून ३१ मिनिटांनी मुंबईला पोहोचली. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमधून, ५ वाजून ४८ मिनिटांनी हे हृदय मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचले. १,१४४ किलोमीटर्सचे अंतर केवळ ३ तास १८ मिनिटांत पार करण्यात आले.