Join us

ब्रिटनमध्ये उद्यापासून जागतिक शिक्षण परिषद

By admin | Updated: January 18, 2015 00:54 IST

ब्रिटनच्या शिक्षण विभागातर्फे लंडन येथे सोमवारपासून जागतिक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे

मुंबई : ब्रिटनच्या शिक्षण विभागातर्फे लंडन येथे सोमवारपासून जागतिक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत चालणाऱ्या या परिषदेसाठी जगभरातील ८०हून अधिक मंत्री या फोरममध्ये सहभागी होत आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत. या फोरमच्या माध्यामातून शैक्षणिक धोरण व विकास यावर चर्चा होईल.ब्रिटन शिक्षणमंत्री निकी मॉर्गन युनिस्कोचे कियान टँग यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार असून युनेस्कोने तयार केलेल्या जगभरातील शाळाबाह्य मुलांवरील अहवालाचे प्रकाशन होणार आहे. या फोरमसाठी भारतातून केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योगमंत्री राजीव प्रताप रूडी, विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा आणि गुजरातचे अतिरीक्त मुख्य सचिव अरविंद अग्रवाल सहभागी होणार आहेत.गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणे, कौशल्यपूर्ण तसेच माहितीपट शिक्षण यांचा समतोल साधणे, शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणे, शिकणे आणि शिकवण्याच्या पद्धतीचा धोरणात्मक विकास करण्यासाठी माहितीचे आदान-प्रदान, नाविन्यपूर्ण शिक्षण आणि बुद्धीमत्ता व कौशल्याचा विकास, शिक्षणातून आर्थिक विकास साध्य करण्यासाठी विविध उपक्रम, शिक्षणावरील वर्षभराचे नियोजन, दक्षिण आशियातील देशांचे उच्च शिक्षणविषयक धोरण अशा विविध विषयांवर या आठवडाभरात ऊहापोह होणार आहे. (प्रतिनिधी)राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडनमधील किंग्स कॉलेज विद्यापीठाला भेट देणार आहेत. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रारूप तयार करून त्यातून उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्याचा विकास साधणे या विषयावर बुधवारी होणाऱ्या परिसंवादात विनोद तावडे सहभागी होणार आहेत.