Join us

उद्धव यांचा तडजोडीस नकार

By admin | Updated: January 7, 2015 01:34 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी जयदेव यांच्याशी तडजोड करण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी जयदेव यांच्याशी तडजोड करण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला असून, याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़मात्र न्या़ गौतम पटेल यांनी पुन्हा एकदा तडजोडीचा विचार करण्याची सूचना उद्धव यांना केली असून, याची पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे़ त्यामुळे पुढील सुनावणीला तरी उद्धव यांचे मत परिवर्तन होणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ कारण या तडजोडीस जयदेव यांनी होकार दिला आहे़ ठाकरे बंधूंमध्ये समेट न झाल्यास बाळासाहेबांचे विश्वासू डॉक्टर जलील पारकर यांची या वादात साक्ष होणार आहे़ बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून ठाकरे बंधूंची आपापसात कायदेशीर लढाई सुरू आहे़ याची आता रितसर सुनावणी न्या़ पटेल यांच्यासमोर सुरू आहे़ गेल्या महिन्यात न्यायालयाने उभयतांना यावर समोपचाराने तोडगा काढण्याची सूचना केली होती़ त्यास जयदेव यांनी होकार दिला़ मात्र उद्धव यांचे वकील राजेश शहा यांनी यासाठी वेळ मागून घेतला होता़ मंगळवारी झालेल्या सुनावणीत अ‍ॅड़ शहा यांनी यास उद्धवचा नकार असल्याचे कळवले़