Join us

हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना विकत घेता येत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

By admin | Updated: April 20, 2016 07:37 IST

हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही असा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपाला मारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २० - नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकांबरोबर काही ग्रामपंचायतींचे निकाल लागले ते संमिश्र स्वरूपाचे आहेत व भाजपला अनेक ठिकाणी अस्तित्वासाठी झगडावे लागत असेल तर सत्तेची मधुर फळे जनतेच्या मुखी न लागता दुसरेच कोणीतरी लुटालूट करीत आहे हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेने या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र त्याचवेळी भाजपची झालेली घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी आहे. हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही असा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपाला मारला आहे.
 
राज्यात बदलाचे वारे इतक्या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते, पण नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी धूळधाण उडाली आहे तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या काँगे्रस पक्षाला लोकांनी उचलून आपटले होते त्या काँगे्रस पक्षाची मूर्च्छितावस्था जाऊन तरतरी यावी असे काही निकाल लागले आहेत. जानेवारी महिन्यात राज्यातील २८९ पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातही भाजपास लोकांनी साफ झिडकारल्याने त्यांचा चेहरा ‘सेल्फी’ काढण्यालायकच झाला होता असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेवर आहे व त्यांचे मंत्री तसेच पुढारी विकासाच्या नव्या घोषणांचे नारळ रोज वाढवत आहेत, पण त्या नारळात पाणी व खोबरे दोन्ही नसल्याने नुसत्या करवंट्यांचेच आवाज येत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
केंद्रात भाजपचे राज्य एकहाती आल्यापासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आलाच होता. इतकेच काय, देशातील प्रमुख विद्यापीठे व शैक्षणिक संकुलांतही भाजपने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात रोहित वेमुलाची आत्महत्या झाली व कन्हैयाकुमारचा जन्म झाला. हेच यश मानायचे असेल तर शत-प्रतिशत मार्गी लागले असे म्हणायला जागा आहे असा टोला उद्धव ठाकरेंना हाणला आहे.
 
महाराष्ट्राचेही राज्य जणू मुठीतच आले, पण राज्य मुठीत आले तरी जनमत किंवा लोकभावना मुठीत आल्या असे होत नाही. उसळलेली लाट खाली बसते व हवेचा वेगही कमी होतो. हवेमुळे उडालेला धुरळा सहज खाली बसतो. हा सृष्टीचा व राजकारणाचा नियम आहे. अणे नामक माकडाच्या हाती सुरी देऊन केक कापला तरी विदर्भ जसा महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही तशी हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही. राष्ट्रवादी ग्रामीण भागातून हद्दपार होत आहे, ही आनंदाचीच गोष्ट, पण काँग्रेसचा काळ सोकावतोय ही चिंतेची बाब निदान आमच्यासाठी तरी आहेच. जनतेची फसवणूक व भ्रमनिरास हेच त्याचे कारण आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.