लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : फोर्ट विभागातील एका खासगी कंपनीमध्ये मराठी कर्मचारी महेश पवार याला ‘एक बिहारी - सब पे भारी’ असे हिणवून त्रास देणाऱ्या परप्रांतीय मॅनेजरला उद्धवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी जाब विचारला. उद्धवसेनेच्या दणक्यानंतर या मॅनेजरने पवार यांची माफी मागितली आहे.
एका खासगी कंपनीमध्ये गेल्या १९ वर्षांपासून पवार काम करत आहेत. याच कंपनीत एका वर्षांपूर्वी वरिष्ठ लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून नितीश कुमार रुजू झाला. नितीश कुमार गेल्या सहा महिन्यांपासून महेश यांना मानसिक त्रास देत होता. तर, राज्यात नवे सरकार आल्यापासून ‘एक बिहारी - सब पे भारी’ असे हिणवत होता.
महेश यांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे नितीश यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती; परंतु, त्यांनी त्याची दखल न घेतल्याने महेश यांनी उद्धवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. शिंदे यांनी शिवसैनिकांसह कंपनीच्या कार्यालयात शिरून मॅनेजर नितीश कुमारला ‘एक बिहारी - सब पे भारी, आता किती जणांवर भारी पडणार ते सांग,’ अशी विचारणा केली. उद्धवसेनेच्या या दणक्यांनंतर मॅनेजर नरमला. त्याने पवार यांची माफी मागितली. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटविले.
मॅनेजरविरोधात पवार यांनी पोलिस तक्रार केलेली नाही. उद्धवसेनेच्या इशाऱ्यामुळे मॅनेजरचा त्रास कमी होईल, अशी आशा त्यांना आहे. तो त्रास कमी न झाल्यास पुन्हा मॅनेजरला सेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल. - विभागप्रमुख संतोष शिंदे, दक्षिण मुंबई, उद्धवसेना