Join us  

उद्धव-खडसे भेटीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:34 AM

माजी मंत्री एकनाथ खडसे हे येत्या तीन-चार दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. खडसे भाजपात फार काळ राहणार नाहीत

अनिकेत घमंडी डोंबिवली : माजी मंत्री एकनाथ खडसे हे येत्या तीन-चार दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. खडसे भाजपात फार काळ राहणार नाहीत, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडेच जळगावमध्ये केले होते. नारायण राणे यांना काँग्रेसमधून रालोआत प्रवेश दिल्यानंतर आता खडसे यांना हाताशी धरून भाजपावरील दबाव वाढवण्याच्या दिशेने शिवसेनेची पावले पडत असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.डोंबिवलीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाºयांना खडसे यांच्या संपर्कात राहण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे-खडसे संभाव्य भेटीची माहिती देणाºया डोंबिवलीतील पदाधिकाºयाने सांगितले की, जळगावमधील शिवसेनेचा एक पदाधिकारी खडसे यांच्याशी सध्या चर्चा करीत असून त्यांच्या दोनवेळा भेटीगाठी झाल्या आहेत. खा. राऊत यांनी अलीकडेच जळगाव दौरा करून खडसे-ठाकरे भेटीच्या दृष्टीने मशागत केली आहे. त्या वेळी डोंबिवलीचे नेतेही त्यांच्यासमवेत होते.राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपला समावेश होणार किंवा कसे, याची चाचपणी खुद्द खडसे हेही करीत असून आपल्याला डावलले जाणार हे त्यांना स्पष्ट दिसले तर भाजपाचा त्याग करू शकतात. त्या वेळी त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच पर्याय असू शकतात. खडसे यांचा जळगावमधील शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संघर्ष आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते सुरेशदादा जैन व खडसे यांच्यातही दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. गेल्या काही महिन्यांत उभयतांमधील वैयक्तिक कटुता काही प्रमाणात कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात जळगाव महापालिकेची निवडणूक आहे. खडसे यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती तुटली, असा आरोप उद्धव यांनीच केला होता. त्यामुळे खडसे यांच्याशी सलगी करताना या सर्व राजकीय संबंधांचा विचार शिवसेना नेतृत्वाला करावा लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ खडसे