Join us

उबर टॅक्सीवर बंदीची शिफारस?

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

नवी दिल्लीतील उबर टॅक्सीचालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली.

मुंबई : नवी दिल्लीतील उबर टॅक्सीचालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी टॅक्सी कंपन्यांना सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन उबर टॅक्सी कंपनीकडून करण्यात न आल्याने त्यांच्यावर बंदीची शिफारस परिवहन सचिव कार्यालयाकडे एका पत्राद्वारे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी दिल्लीतील बलात्कार घटनेनंतर परिवहन विभागाने खासगी टॅक्सी कंपन्यांची २0१४च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत टॅक्सीचालक, वाहन यांची माहिती सादर करण्यासाठी ११ डिसेंबरची तर सुरक्षेसंदर्भातील उपाय आणि अन्य माहिती सादर करण्यास ३१ डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली. सर्व खासगी टॅक्सी कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या सुरक्षा उपाय आणि अन्य तांत्रिक बाबी यांची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जानेवारीपासूनची डेडलाइनही देण्यात आली. टॅक्सीचालक आणि वाहकांची माहिती कंपन्यांकडून परिवहन विभागालाही देण्यात आली. दरम्यान, उबर कंपनी सोडता अन्य टॅक्सी कंपन्यांकडून सुरक्षेसंदर्भातील उपायांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मात्र उबर कंपनीकडून सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची अंमलबजावणी अद्यापही न करण्यात आल्याने त्यावर बंदीची शिफारस एका पत्राद्वारे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिवहन सचिव कार्यालयाकडे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात परिवहन आयुक्त महेश झगडे यांना विचारले असता, त्यांनी यासंदर्भात काही न बोलणे पसंत केले. (प्रतिनिधी)च्अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) गौतम चॅटर्जी यांना विचारले असता, उबर टॅक्सी कंपनीसंदर्भात एक पत्र परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आमच्याकडे आले आहे. च्बंदीचा अद्याप काही निर्णय झालेला नसून परिवहन आयुक्तांकडे चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.