मुंबई : दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता मुंबईतही या टॅक्सीच्या चालकाने एका महिलेशी अरेरावी करत तुम्हाला बघून घेईन, असे धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने घडलेला प्रकार फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेचे सहकारी तिच्यासोबत होते. मात्र सहकारी नसते तर माझे काय झाले असते, असा सवालही तिने उपस्थित केला आहे. उबेरने याची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. लोअर परळ ते अंधेरीतील लोखंडवाला येथे जाण्यासाठी या महिलेने उबेरची टॅक्सी आरक्षित केली. जुहू येथे एका सिग्नलवर महिलेचे सहकारी टॅक्सीतून उतरल्यावर चालकाने तरूणीशी वाद घालण्यास सुरूवात केली. ही सेवा मुंबई दर्शनासाठी नाही. तुमच्या सारख्या लोकांना काही पिवळी टॅक्सीच योग्य आहे, उबेर सेवा घेण्याची तुमची क्षमता नाही, असे टॅक्सी चालक महिला व तिच्या मित्रांवर ओरडत होता. त्यानंतर त्याने मी तुम्हाला बघून घेतो, तुम्ही स्वत:ला काय समजता, असेही टॅक्सी चालकाने त्यांना धमकावले. त्यामुळे त्यांनी टॅक्सी उतरण्याचा निर्णय घेतला.या महिलेने फेसबूकवर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सुरक्षा, सुविधा आणि ग्राहक सेवा या तिन्ही गोष्टी उबेरकडून मिळालेल्या नाहीत.उबेरने चालकांना चांगल्या व सौजन्यपूर्ण वागणुकीची शिकवण द्यायाला हवी, असेही महिलेने फेसबुकवर म्हटले आहे. मात्र या घटनेमुळे खासगी टॅक्सी सेवा देणा-या कंपन्यांची अरेरावी उघड झाली आहे.
उबेरची मुंबईतही अरेरावी
By admin | Updated: June 7, 2015 03:05 IST